युद्धसरावाशी तुमचा काही संबंध नाही !  – अमेरिकेने चीनला सुनावले !

उत्तराखंडमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध सरावावर चीनचा आक्षेप !

नवी देहली – उत्तराखंडमधील औली येथील सीमेजवळ भारत आणि अमेरिका यांच्या सैन्यामध्ये युद्धसराव चालू आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे. त्यावर भारत आणि अमेरिका यांनी चीनला सुनावलेे आहे. अमेरिकेने म्हटले आहे, ‘हा भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतर्गत विषय आहे. यात तुमचा काही एक संबंध नाही.’ आदल्या दिवशी भारताने ‘आम्ही कुणासमवेतही युद्धाभ्यास करू, यासाठी आम्हाला तिसर्‍या देशाचे मत घेण्याची आवश्यकता नाही’, अशा शब्दांत चीनला सुनावले होते.

१. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, चीन सीमेजवळ अमेरिका आणि भारत यांच्यातील सराव वर्ष १९९३ आणि १९९६ मध्ये भारत आणि चीन यांच्यामधील कराराच्या विरोधात आहे. (भारताच्या भूमीत वारंवार घुसखोरी करणे, हे कोणत्या करारात बसते ? – संपादक) याचा भारत आणि चीन यांच्या संबंधावर वाईट परिणाम होईल.

२. याला प्रत्युत्तर देतांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, अमेरिकेसमवेतच्या सरावाचा वर्ष १९९३ आणि वर्ष १९९६ च्या करारांशी काहीही संबंध नाही. चीनने स्वतःहून होत असलेल्या या कराराच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे.

३. भारत आणि अमेरिका यांच्यातील हा सैनिकी सराव १५ नोव्हेंबरपासून चालू झाला आहे. हा युद्धाभ्यास भारतात एक वर्ष आणि अमेरिकेत एक वर्ष चालतो. गेल्या वर्षी अमेरिकेतील अलास्का येथे हा युद्धाभ्यास झाला होता.