चर्चचे अनधिकृत बांधकाम महापालिकेकडून उद्ध्वस्त !

नवी मुंबई येथील चर्चमधील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण

नवी मुंबई – सिवूड येथील बेथेल गॉस्पेल चर्चद्वारे चालवण्यात आलेल्या अवैधपणे बालाश्रमामध्ये ४ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. या चर्चचे अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांनी संयुक्त विद्यमाने कारवाई करून उद्ध्वस्त केले. या वेळी पुष्कळ प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्त मिताली संचेती यांनी सांगितले की, या चर्चद्वारे अवैधपणे चालवण्यात आलेल्या बालाश्रमामध्ये काही मुली आणि महिला होत्या. २ दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांना अनेक ठिकाणी हलवले. त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी चर्चमध्ये वास्तव्यास असलेला फादर येसुदासन, त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्या विरोधात अनधिकृत बांधकाम प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चर्चला भेट दिली. त्या वेळी तेथे २ मुली आणि १ मुलगा वास्तव्यास असल्याचे आढळून आले होते. चित्रा वाघ यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर आणि पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन अनधिकृत चर्च असतांनाही ते अद्यापपर्यंत सील करण्यात आले नाही किंवा ते पाडण्यात आले नाही, याविषयी खडसावले होते. ८ दिवसांमध्ये चर्चवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेले पोलीस, महापालिका अन् सिडको प्रशासन यांनी २ डिसेंबर या दिवशी सकाळी चर्चचे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केले.

संपादकीय भूमिका

एवढ्या मोठ्या चर्चचे अनधिकृत बांधकाम केले जात असतांना त्याकडे दुर्लक्ष करणारे संबंधित पोलीस, सिडको आणि पालिका यांचे अधिकारी यांच्यावरही गुन्हे नोंद करून कायदेशीर कारवाई केली, तरच अशा गोष्टींना आळा बसू शकेल !