अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी कब्रस्तान बनवण्याचे प्रकरण !
ठाणे, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी मुसलमानांचे कब्रस्तान बनवण्याचा महानगरपालिका आणि काही सामाजिक संस्था यांचा घाट असून त्याला अंबरनाथ येथील गावकर्यांचा विरोध आहे. हे कब्रस्तान हटवण्यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ नागरिक २९ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता सहस्रोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. शिष्टमंडळाने उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन कब्रस्तानची अनुमती रहित करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांनी कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तसेच शासनाने कब्रस्तानाविषयी अहवाल मागितला असून तो पाठवल्याची माहिती आयुक्त अजीज शेख आणि उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
१. उल्हासनगर महानगरपालिकेने कँप क्र. १ येथील उल्हास नदीच्या शेजारी आयडीआय आस्थापनाच्या जवळील भूखंड कब्रस्तानसाठी दिला. यात काही जण न्यायालयात गेले, तरी कब्रस्तान चालू आहे.
२. त्यानंतर कँप क्र. ५ येथील कैलास कॉलनीमध्ये कब्रस्तानची मागणी मुसलमान संघटनेने लावून धरल्यावर त्या ठिकाणीही कब्रस्तानसाठी भूखंड देण्यात आला.
३. महानगरपालिकेने कब्रस्तानच्या भूखंडाभोवती संरक्षण भिंतीचे काम चालू केले होते. ‘अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात कब्रस्तान नको; त्या दुसरीकडे भूखंड द्या’, अशी भूमिका गावकरी, बजरंग दल आणि समविचारी हिंदुत्ववादी संघटना यांनी घेतली असून या संदर्भात उल्हासनगर महानगरपालिकेवर मोर्चा काढून कब्रस्तानला विरोध केला आहे. (प्राचीन मंदिराशेजारी उभारल्या जाणार्या कब्रस्तानाला विरोध करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक)