भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

बीड येथील हिंदु देवस्थान भूमी घोटाळा प्रकरण

बीड – बनावट कागदपत्रे सिद्ध करून हिंदु देवस्थान भूमीचे बेकायदेशीरपणे हस्तांतर केल्याच्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी प्राजक्ता धस, भाऊ देविदास धस, मनोज रत्नपारखी आणि अस्लम नवाब खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील हिंदु देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदवून चौकशी करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करत आहेत. याविषयी खाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. यानंतर न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला धस आणि इतरांविरद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश १८ ऑक्टोबला दिला.


खाडे यांनी केलेल्या तक्रारीत आमदार सुरेश धस यांचे नाव घेतल्याने त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुरेश धस यांची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर संभाजीनगर खंडपिठाने तक्रारदार राम खाडे यांची १३ जानेवारी २०२२ या दिवशी प्रविष्ट करण्यात आलेली तक्रार ग्राह्य धरून गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला. त्यानुसार २९ नोव्हेंबर या दिवशी ‘भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८’ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचे पुढील अन्वेषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.