पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या सांगली येथील ‘सदानंद’ या निवासस्थानाचे दर्शन घेतांना अन् त्यांच्या नावाची पाटी काढतांना आलेल्या अनुभूती

मूळ सांगली येथील आणि आता फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे यांचा मार्गशीर्ष शुक्ल नवमी (१.१२.२०२२) या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधकाला त्याच्या कुटुंबियांसमवेत पू. परांजपेआजोबांच्या सांगली येथील निवासस्थानाचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे

पू. सदाशिव परांजपेआजोबा यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘मी माझ्या कुटुंबियांसमवेत देवदर्शन आणि पूजाविधी करण्यासाठी श्री दत्तगुरूंचे स्थान असलेल्या नृसिंहवाडी येथे गेलो होतो. त्या वेळी देवाने मला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे आई-वडील पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी आणि पू. सदाशिव परांजपेआजोबा यांच्या सांगली येथील निवासस्थानाचे दर्शन घेण्याचा विचार दिला. आम्ही सर्वांनी तेथे जाऊन त्या चैतन्यमय स्थानाचे दर्शन घेतले. सध्या पू. परांजपेआजी आणि आजोबा तेथे रहात नाहीत. ते हा बंगला विकून सनातन संस्थेच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी कायमस्वरूपी गोवा येथे वास्तव्यास गेले आहेत; पण तरीही मला त्या वास्तूत संतांचे चैतन्य जाणवले.

१. अवतारी संतांच्या साधनेच्या चैतन्याने भारीत झालेली ‘सदानंद’ ही दैवी वास्तू !  

पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि आजी यांच्या सांगली येथील या बंगल्याचे नाव ‘सदानंद’ असे होते. ‘ज्या वास्तूच्या नावातच एवढा आनंद आहे, तर तेथे वास्तव्य केलेल्या व्यक्ती किती आनंदी असतील !’, असा माझ्या मनात विचार आला. येथेच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ लहानाच्या मोठ्या झाल्या. हे घर म्हणजे नुसते विटा-मातीने बनवलेली वास्तू नाही, तर प्रत्यक्ष ‘नाममंदिर’ होते. पू. सदाशिव परांजपेआजोबा यांनी (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वडिलांनी) अपार कष्ट घेऊन ही वास्तू घडवली होती. या नाममंदिरस्वरूप वास्तूची पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी यांनी (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आईने) ‘हा देवाने दिलेला ठेवाच आहे’, या भावाने अगदी प्रेमाने जपणूक केली होती. अवतारस्वरूप ‘श्रीचित्शक्ति’ला जन्म देणार्‍या संतद्वयींनी या वास्तूत केलेले नामस्मरण, सेवा आणि भाव यांमुळे ती वास्तू खर्‍या अर्थाने जिवंत झाली होती. आजही तेथे गेल्यावर ‘श्रीराम, श्रीराम’ हा नामजप भूमीतून वर येऊन वातावरणात विरून जात आहे’, असे दिसते.

२. बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर लावलेली ‘श्री. एस्.एन्. परांजपे’ या नावाची संगमरवरी पाटी संग्रहासाठी आणतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

बंगल्याच्या प्रवेशद्वारावर लावलेली नावाची पाटी

२ अ. संतांचे नाव असलेल्या पाटीला भावपूर्ण नमस्कार करणे : सध्या त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. आम्ही ज्या वेळी त्या वास्तूचे दर्शन घेण्यासाठी गेलो, त्या वेळी नवीन बांधकाम करणार्‍यांनी घराच्या बाहेरची पूर्वीची भिंत तशीच ठेवली होती. त्या भिंतीवर आम्हाला ‘श्री. एस्.एन्. परांजपे’ (पूर्ण नाव : श्री. सदाशिव नारायण परांजपे) अशी अक्षरे लिहिलेली नावाची पाटी (नेमप्लेट) दिसली. ती पाटी पाहिल्यावर आम्ही तिच्यावर मस्तक ठेवून भावपूर्ण नमस्कार केला.

२ आ. बांधकाम करणार्‍या अभियंत्यांना ती पाटी काढून मागितल्यावर त्यांनी आनंदाने साहाय्य करणे : ‘बांधकाम करतांना नावाची पाटी असलेली भिंत पाडणार असल्याचे माझ्या लक्षात आले. मी बांधकामाचे दायित्व असणार्‍या अभियंत्याला विचारले, ‘‘या घरात पूर्वी संत रहात होते. तुम्ही त्यांच्या नावाची ही पाटी आमच्या (सनातनच्या) आश्रमामध्ये जतन करण्यासाठी आम्हाला काढून देऊ शकता का ?’’ त्यावर लगेचच ते अभियंता आनंदाने म्हणाले, ‘‘हो. हे तुमच्या गुरूंचेच आहे. तुम्ही अवश्य घेऊ शकता.’’ त्यांनी स्वतः तिथे उभे राहून एका कामगाराला ती पाटी अगदी काळजीपूर्वक काढण्यास सांगितले.

२ इ. पाटी भिंतीतून निघाल्यावर ती खाली भूमीवर न पडता अखंडपणे कामगाराच्या हातांत येणे : पाटी असलेल्या भिंतीचे बांधकाम एवढे भक्कम होते की, पाटी सहज निघत नव्हती. ‘पाटी व्यवस्थित आणि अखंडपणे निघावी’, अशी मी प्रार्थना करत होतो. अर्ध्या घंट्यापासून तो कामगार पाटी काढण्यासाठी छिन्नी आणि हातोडा यांचे घाव घालत होता; पण पाटी अंशमात्रही हालत नव्हती. माझे प्रार्थना करणे चालूच होते. अचानक हातोड्याच्या घावाने ती पाटी भिंतीमधून संपूर्णपणे बाहेर निघाली. आश्चर्य म्हणजे पाटी भिंतीतून निघाल्यावर ती खाली भूमीवर न पडता अखंडपणे अलगदच कामगाराच्या हातांत आली. ते पाहून मला पुष्कळ आनंद झाला आणि भगवंताच्या चरणी कृतज्ञताही व्यक्त झाली. ते अभियंताही मला म्हणाले, ‘‘सहसा अशी संगमरवरी पाटी भिंतीतून अखंड निघणे अशक्यप्राय असते. ती काढतांना अनेकदा तुटते; पण ही पाटी काढतांना तसे झाले नाही. देवाच्या कृपेनेच ती अखंड निघाली आहे.’’

२ ई. पाटी काढल्यानंतर जाणवलेली सूत्रे : ‘पाटी निघाल्यावर या वास्तूशी असलेले माझे स्थूलरूपातील ऋणानुबंध देवाने या पाटीच्या माध्यमातून सोडवले असून स्थानदेवतेनेच आनंदाने मला ती पाटी गुरुगृही (रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात) नेण्यास दिली आहे’, असे मला वाटले. ‘ती पाटी आणण्यासाठीच देवाने आम्हाला नृसिंहवाडीला नेले होते’, असेही माझ्या लक्षात आले.

३. पाटी हातात घेतल्यावर ‘विठ्ठलाच्या पायाखालची वीटच सद्गुरूंनी हातांत दिली आहे’, असे वाटणे  

गाडीमध्ये बसल्यावर जेव्हा मी ती पाटी माझ्या मांडीवर ठेवली, तेव्हा ‘पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायाखाली असलेली वीटच सद्गुरूंनी माझ्या हातात दिली आहे आणि या विटेच्या माध्यमातून देव माझ्या साधनेतील अडथळे दूर करून माझा उद्धार करत आहे’, असे मला वाटले.

४. मुंगुसाचे दर्शन होणे

४ अ. देवाच्या कृपेमुळे पूर्वी संत रहात असलेल्या खोलीच्या ठिकाणी मुंगुसाचे दर्शन होणे : मी त्या वास्तूत गेल्यावर पाटी घेण्यासाठी त्या अभियंत्यांची वाट पहात आधी बाहेर उभा होतो. त्या वेळी देवाने सूक्ष्मातून मला ‘आत उभा रहा’, असे सांगितले. त्याप्रमाणे मी आत उभा असतांना घराच्या मुख्य द्वाराच्या बाहेरून एक मुंगूस अचानक आत आले आणि ते पूर्वी पू. परांजपे आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गेले अन् दिसेनासे झाले. अनेकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूही याच खोलीत विश्रांती घेत असत. आम्ही जेव्हा जेव्हा येथे वास्तव्याला येत असू, तेव्हा काही वेळेस आम्हाला मुुंगुसाचे दर्शन झाले होते. ‘मुंगूस हे श्री लक्ष्मीदेवीचे प्रतीक आहे’, असे मी ऐकले होते आणि ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू या स्वतः श्री लक्ष्मीदेवीस्वरूप आहेत’, असे महर्षि नाडीपट्टीमध्ये वारंवार सांगतात.

४ आ. भोवताली माणसांची वर्दळ असतांनाही मुंगुसाचे ३ – ४ मिनिटे दर्शन होणे : सहसा बांधकाम चालू असतांना आणि भोवताली माणसांची वर्दळ असतांना मुंगुसाचे दर्शन होणे, हे अशक्यप्राय असते. इतर कुठेही अगदी क्षणापुरते मुंगूस दिसते; पण या ठिकाणी जवळजवळ ३ – ४ मिनिटे ते अगदी सहज वावरतांना दिसले.

४ इ. मुंगुसाच्या दर्शनाने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी ‘मी सदैव तुझ्या पाठीशी आहे’, या त्यांच्या वाक्याची प्रचीती दिल्याचे जाणवणे : काही दिवसांपासून कौटुंबिक अडचणींमुळे मी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत न जाता घरी थांबलो आहे. तेव्हा मला वाटले, ‘मुंगुसाच्या रूपात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनीच मला दर्शन दिले आणि ‘भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे’, याची प्रचीती दिली.’ या वेळी मला एक प्रसंग आठवला. एकदा मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना नमस्कार करत असतांना त्या मला म्हणाल्या, ‘‘मला वेगळा नमस्कार करण्याची आवश्यकता नाही. मी सदैव तुझ्या समवेतच आहे.’’ ‘आज या मुंगुसाच्या दर्शनाने त्यांनी मला याची पुनः  प्रचीती दिली’, असे मला वाटले.

५. ‘श्री. एस्.एन्. परांजपे’ या नावाचा लक्षात आलेला भावार्थ

‘श्री. एस्.एन्. परांजपे’ म्हणजे ‘श्री. सदाशिव नारायण परांजपे !’ ‘सदाशिव’ या नावात शिवतत्त्व, ‘नारायण’ या नावात विष्णुतत्त्व आणि ‘परांजपे’ (ब्रह्मत्वाकडे नेणारा परावाणीतील नामजप) या आडनावात ब्रह्मतत्त्व असे त्रिदेवांचे तत्त्व एकत्रित स्वरूपात कार्यरत असल्याचे मला वाटते.

भगवंताने मला ही सेवा करण्याची संधी दिली आणि आनंद दिला, त्यासाठी मी त्याच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो.’
– एक साधक, गोवा (१२.२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.