भोसरी (पुणे) येथे कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’चे आयोजन !

२१ ते २५ डिसेंबर या कालावधीत कामधेनू यज्ञ

डावीकडून बसलेले पंडित वसंतराव गाडगीळ, मा. दिलीपराव देशमुख, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. दिलीप कुलकर्णी, श्री. काशिनाथ थीटे पाटील, अधिवक्ता ज्ञानेश्वर तुपे, डावीकडून मागे उभे असलेले पुरुषोत्तम लड्डा, डॉ. प्रमोद मोघे, शास्त्रज्ञ डॉ. ज्योती मुंदरगी, ईशा ढमढेरे, रामचंद्र जांभेकर गुरुजी, आश्विन ब्रह्मे, श्री. राजेंद्र खुळे, श्री. सचिन इंगळे

पुणे – भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी जनमित्र सेवा संघ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने गो आधारित आत्मनिर्भर ग्राम असे उद्दिष्ट ठेवून कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’ आयोजित करण्यात आलेली आहे, अशी माहिती पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत संयोजकांनी दिली. या वेळी गोपरिषदेत घेण्यात येणारे विषय सविस्तर सांगण्यात आले.

१. महाराष्ट्रात असणार्‍या १ सहस्र २०० गोशाळांच्या समस्या आणि त्यावर उपाय यांविषयी परिषदेत चर्चा होणार आहे.

२. प्रत्येक राज्याला गोसेवा आयोग बंधनकारक करावा, गोचर भूमी (गायराने) अतिक्रमणमुक्त करून गोपालक संस्थांना मिळावी. गोमाता संगोपनासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळावे, गोसंरक्षण कायद्यातील त्रुटी दूर कराव्यात, शासकीय रुग्णालये, धर्मादाय आयुक्त यांच्याकडून नोंदणीकृत रुग्णालये यामध्ये पंचगव्य चिकित्सा विभाग चालू व्हावेत, यावर विचार मंथन करून उपाययोजनांच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

३. गोमाता हा आदर्श जीवनशैली निर्माण करणारा केंद्रबिंदू आहे, तसेच ‘देशी गाय आणि तिचा लाभ’ याची माहिती लहान मुले अन् तरुण यांना व्हावी, यावर भर दिला जाणार आहे.

४. प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती, शालेय विद्यार्थी आणि युवा वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात या परिषदेला भेट द्यावी, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.

५. परिषदेत २ दिवस पूर्ण वेळ उपस्थित रहाण्यासाठी प्रवेश मर्यादित असून अभ्यासू व्यक्तींना प्रवेश दिला जाईल; मात्र अभ्यास विभागासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. परिषद आणि स्टॉल हे सर्वसामान्य नागरिकांना खुले असून २० रुपये प्रवेशशुल्क आकारले जाणार आहे.

जनमित्र सेवा संघ; गौ विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार; विवेक विचार समूह, मुंबई; इस्कॉन; रोटरी क्लब; विश्व हिंदु परिषद या आणि अशा अन्य गोसंघटना, गोप्रेमी यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत विविध स्तरांवरील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन असणार आहे. काही संशोधनपर ‘पेपर्स’ही मांडले जातील. गोमाता विषयीच्या माहितीचे चित्रप्रदर्शन आणि २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत कामधेनू यज्ञ होणार आहे.