महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असे संतपीठ झाले पाहिजे !
पैठण (जिल्हा संभाजीनगर) – संत साहित्याच्या अभ्यासाचे आकर्षण समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना खुणावत आहे. संत विद्यापिठातील दुसर्या वर्षाच्या प्रवेशार्थींमध्ये ३ आधुनिक वैद्य, ४ शिक्षक, १ लेखक, १ पोलीस अधिकारी, २ प्राध्यापक, ३ महिला कीर्तनकार आणि २ सनदी लेखापाल यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत दहिवाडकर आणि माजी उपमहापौर संजय जोशी यांचा समावेश आहे.
मराठवाड्यात संतसाहित्याची परंपरा असल्याने राज्यशासनाने वर्ष २०२१ मध्ये संतपीठ विद्यापिठाचे लोकार्पण केले. या संतपिठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे ५ वर्षांसाठी पालकत्व दिले असून ५ प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केले आहेत. यासाठी १० प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. राज्यभरात २ सहस्र वारकरी शिक्षण संस्था आहेत; मात्र अशा स्वरूपाचे अभ्यासक्रम असणारे पैठण येथील संतपीठ हे पहिलेच आहे. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संतपरंपरा, संक्षिप्त इतिहास आणि सामाजिक योगदान यांचे धडे घेता येणार आहेत.