मदरशांमध्ये शिकणार्‍या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रहित !

प्रतिदिन मध्यान्ह भोजन आणि विनामूल्य पुस्तके देत असल्यामुळे केंद्रशासनाने घेतला निर्णय !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मदरशांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यापुढे शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. उत्तरप्रदेशातील मदरशात शिकणार्‍या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापासून रोखण्यात आले आहे.

१. आतापर्यंत पहिली ते पाचवी या इयत्तांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना १ सहस्र रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती मिळत होती.

२. केंद्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते. या मदरशांमध्ये मध्यान्ह भोजन आणि पुस्तकेही विनामूल्य दिली जातात. याखेरीज इतर आवश्यक गोष्टीही विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात. यामुळे शिष्यवृत्ती रोखण्यात आली आहे.

३. यापुढे केवळ इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याच विद्यार्थ्यांचे अर्ज पुढे संमतीसाठी पाठवण्यात येतील.

४. गत वर्षी अनुमाने ५ लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला. यामध्ये १६ सहस्र ५५८ मदरशांचा समावेश होता.

संपादकीय भूमिका

असे आहे, तर याआधीच हा निर्णय घेणे आवश्यक होते. जनतेचे सहस्रो कोटी रुपये अशा प्रकारे व्यय (खर्च) होऊ देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांकडून ही रक्कम वसूल करा !