मुंबई महानगरक्षेत्रात गोवरच्या रुग्णांत वाढ !

राज्यात १० सहस्र गोवरचे संशयित रुग्ण

मुंबई – मुंबई महानगरक्षेत्रात गोवरच्या रुग्णात वाढ झाली असून राज्यात आतापर्यंत ६५८ गोवरचे रुग्ण सापडले असून संशयित रुग्णांची संख्या १० सहस्र २३४ इतकी आहे. १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गोवरबाधित महानगरपालिकांचे आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली.

मुंबई महानगरक्षेत्रातील भिवंडी, ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा, वसई-विरार महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिका या क्षेत्रांतही गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे शहरामध्ये गोवरचे ४४ रुग्ण आढळले असून ३०३ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश रुग्ण मुंब्रा परिसरात आढळून आले आहेत.

मुंबईतील ९ मास ते ५ वर्षे वयोगटातील ३३ आरोग्य केंद्रातील एकूण १ लाख ३४ सहस्र ८३३ बालकांना गोवर रूबेला लसीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे.