टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ३ वाहनांना मागून धडक
पुणे – मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर अपघातांची मालिका चालूच असून २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता एका टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ३ वाहनांना मागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी यातील २ चारचाकींची मात्र मोठ्या प्रमाणात हानी झाली असून एका ‘टेंपो ट्रॅव्हलर’ची किरकोळ हानी झाली आहे. अपघातानंतर टँकरचालक टँकरसह पळून जात असतांना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले आहे. एकंदरीत नवले पुलाजवळ अपघातांची मालिका चालूच असून मागील ७ दिवसांत ९ अपघात झाले आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमंलात आणण्यासाठी ‘सेव्ह लाईफ’ या स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे. ‘नवले पुलावर अधिक उतार असल्याने अपघात होत आहेत’, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हा उतार योग्य असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये मतभेद आहेत; मात्र नवले पूल पाडणे हा त्यावरचा उपाय नाही. ‘सेव्ह लाईफ’ संस्थेकडून आलेल्या उपायांमुळे अपघात अल्प होतील, अशी आशा आहे.