पुणे – महिलांचा पी.एम्.पी. बसमधून होणारा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. पी.एम्.पी. प्रशासनाने महिला प्रवाशांकरिता ‘महिला विशेष बस’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २८ नोव्हेंबरपासून शहरातील १९ मार्गांवर २४ बस धावणार आहेत. या बसमध्ये महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांकरिता सकाळी अन् सायंकाळी गर्दीच्या वेळी या बसगाड्या सोडण्यात येतील. उर्वरित वेळी या बसमधून पुरुष आणि महिला प्रवास करू शकतात.