कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यानच्या अपघातांची कारणे शोधून त्वरित उपाययोजना करा ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, पुणे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे – नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान होणार्‍या अपघातांची कारणे शोधून त्या ठिकाणी भविष्यात अपघात टाळण्याच्या दृष्टीने त्वरित आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन विश्रामगृह, पुणे येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस, तसेच पुणे शहर, तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या हद्दीत गेल्या २ वर्षांत झालेले अपघात आणि त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना आणि त्यानंतर अपघातांच्या प्रमाणात झालेली घट यांविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीस आमदार भीमराव तापकीर, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ‘एन्.एच्.ए.आय.’चे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले की, या महामार्गावर उतार येण्याआधी वाहनचालकांना सावध करण्यासाठी रस्त्यावर फलक लावणे आवश्यक आहे. रस्त्यावरील तपास नाक्यावर सूचना देण्याची व्यवस्था करण्यात यावी. मोठ्या आणि लहान वाहनांसाठी रस्त्यावर वेगवेगळे मार्ग असावेत. त्यासाठी ट्रक, कार इत्यादी वाहनांची चिन्हे, फलक लावावेत. लोकसंख्येसमवेत वाहतूक वाढत असल्याने त्यादृष्टीने भविष्यातील आवश्यक नियोजन करावे. हद्दींचा प्रश्न उपस्थित न करता सर्व विभागांनी समन्वयाने कामे मार्गी लावावीत. आधीच्या आराखड्यातील संमत कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. नवले पुलावर प्रवाशांसाठी ‘स्काय वॉक’ उभारण्यात यावा. रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवण्यात यावे, असे आदेशही त्यांनी या वेळी दिले.