शरद पवार, नितीन गडकरी यांनी कोश्यारी यांचे खंडण का केले नाही ? – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

छत्रपती उदयनराजे भोसले

पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य समजण्यापलीकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेविना देशातील लोकशाही चालूच शकत नाही. शिवाजी महाराजांची विचारधारा नसती, तर आज देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागला असता ?  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द बोलतांना यांना लाज वाटत नाही का ? सुधांशू त्रिवेदी यांचीही बुद्धी भ्रष्ट झाली आहे का ? शरद पवार, नितीन गडकरी यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे खंडण का केले नाही ? अशी तीव्र भावना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍यांना चेतावणी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा विचारही केल्यास असे करणार्‍यांना नेस्तनाबूत करू ! २८ नोव्हेंबरला पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा सांगण्यात येईल.’’