सातारा, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यशासनाकडून नुकताच जिल्हा शैक्षणिक निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यात पहिल्या १० क्रमांकांमध्ये सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे सलग २ वर्षे सातारा जिल्ह्याने हा बहुमान मिळवला आहे.
शैक्षणिक निर्देशांकात सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय, तर रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. गेल्या ३ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या वतीने शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वतंत्र गुणवत्ता कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकडे स्पर्धा परीक्षांसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय विद्यालय परीक्षेतही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या गुणवत्तेत वाढ होत आहे.