एकाएकी उद्भवणारी पोटदुखी आणि पाणी

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ९७

वैद्य मेघराज पराडकर

‘कोणत्याही कारणामुळे एकाएकी पोट दुखत असेल, तर २ ते ४ पेले कोमट पाणी प्यावे आणि स्वस्थ बसून रहावे. तोंडात बोटे घालून उलटी करण्याचा प्रयत्न करू नये. हा उपाय एकदाच करावा. पाणी प्यायल्याने काही अपाय होत नाही. अधिकचे पाणी काही वेळाने लघवीवाटे बाहेर निघून जाते. पाणी पिऊन २ घंट्यांनीही बरे न वाटल्यास मात्र तज्ञांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

वरीलप्रमाणे पाणी प्यायल्याने पुढील लाभ होतात. अपचन झाल्याने अन्न पोटात थबकून पोट दुखत असल्यास आपोआप मळमळून उलटी होते आणि पोटात थबकलेले अन्न बाहेर पडून बरे वाटते. लहान मूतखडा अडकल्याने पोटात दुखत असेल, तर प्यायलेले पाणी लघवीवाटे बाहेर निघून जात असतांना कधी कधी मूतखडा पडून जाऊन बरे वाटते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२२)