नक्षलवाद्यांच्या श्रद्धांजली पत्रकातून खुलासा !
नागपूर – शहरातील कुख्यात गुंड अक्कू यादव याची वर्ष २००४ मध्ये जिल्हा सत्र न्यायालयात महिलांनी सामूहिक हत्या केली होती. या हत्याकांडामागे नक्षलवाद्यांची प्रेरणा होती, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नक्षलवाद्यांनी जारी केलेल्या श्रद्धांजली पत्रकात याचा उल्लेख असून यात अनेक खुलासे करण्यात आले आहेत.
१. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा वरिष्ठ सदस्य आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश अन् छत्तीसगड राज्यांतील नक्षलवाद्यांच्या ‘स्पेशल झोनल कमिटी’चा सचिव मिलिंद तेलतुंबडे याच्या पोलीस चकमकीतील मृत्यूला १ वर्ष पूर्ण झाले आहे.
२. नक्षलवाद्यांकडून गडचिरोली येथील मर्दिनटोलाच्या अरण्यात १३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या सर्व २७ नक्षलवाद्यांना एका पत्रकाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. एकूण ६५ पानांच्या या पत्रकात नक्षलवाद्यांनी अनेक खुलासे केले आहेत.
३. अक्कू यादव याची हत्या करणार्या महिलांना नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे याची प्रेरणा होती. ‘महिलांनी त्यांच्यावर होणार्या अत्याचाराच्या विरोधात पेटून उठावे’, या मिलिंद तेलतुंबडे याच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊनच ही घटना घडली होती’, असा दावा या पत्रकात करण्यात आला आहे.