केरळमध्ये स्वास्थ्य केंद्रातील ‘चेंजिंग रूम’मध्ये महिलांचे व्हिडिओ बनवणार्‍याला अटक !

पठानमथिट्टा (केरळ) – जिल्ह्यातील कुडूर येथे असलेल्या एका स्वास्थ्य केंद्रातील कपडे पालटण्याच्या खोलीत (‘चेंजिंग रूम’मध्ये) एका युवतीचा व्हिडिओ मुद्रित केल्याच्या प्रकरणी रणजित नावाच्या एका रेडिओलॉजिस्टला अटक करण्यात आली आहे. रणजितने अन्य महिलांचेही अशा प्रकारे व्हिडिओ बनवले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रणजित पीडित युवतीचा व्हिडिओ बनवत असल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने त्यास विरोध केला आणि रणजितकडील भ्रमणभाष हातात घेऊन तो व्हिडिओ डिलीट केला. त्यानंतर पोलिसांत तक्रारही प्रविष्ट केली. अशाच घटना गेल्या काही कालावधीत चंडीगड विश्वविद्यालय, आयआयटी बॉम्बे, तसेच तमिळनाडूतील मदुराई येथील एका खासगी महाविद्यालयात घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर संबंधित सर्वांना अटक करण्यात आली होती.