अन्वेषण यंत्रणांद्वारे विरोधकांवर होणार्‍या कारवाईचे सूत्र संसदीय समितीपुढे उपस्थित करणार ! – खासदार संजय राऊत

संजय राऊत

मुंबई – मागील काही वर्षांत विरोधकांवर अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांसारख्या केंद्रीय यंत्रणांद्वारे  कारवाई केली जात आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हे सूत्र संसदीय समितीपुढे उपस्थित करणार आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

खासदार राऊत पुढे म्हणाले, ‘‘या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती किंवा माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात यावी. पत्राचाळीशी माझा काहीही संबंध नाही. पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणात मला झालेली अटक अनधिकृत होती. हा देश राज्यघटनेच्या चौकटीत चालतो. राज्यघटनेचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे काम आहे. कारागृहात माझा अतिशय छळ झाला. मी लवकरच देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. माझ्यावर कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली, याची माहिती त्यांना देणार आहे.