याविषयी भारतातील बुद्धीप्रामाण्यवादी, कथित पुरो(अधो)गामी आणि नास्तिकवादी यांना काय म्हणायचे आहे ?
१. भौतिकशास्त्रांद्वारे विश्वाचा उलगडा करता येणार नाही ! – खगोलशास्त्रज्ञ सर ऑर्थर एडिंग्टन
‘केंब्रिज विद्यापिठाचे सर ऑर्थर एडिंग्टन हे खगोलशास्त्रज्ञ आहेत. ते सांगतात, ‘विश्वाचा उलगडा भौतिकशास्त्रांना करता येईल. ही १९ व्या शतकाची कल्पना आधुनिक शास्त्रज्ञांनी झुगारून टाकली आहे. नास्तिकवाद आता पार संपलेला आहे. अध्यात्म आणि बुद्धी यांवर अधिष्ठित झालेल्या सनातन धर्मावर कुणीच घाला घालू शकत नाही.’
२. अध्यात्म भौतिकता निर्माण करते आणि त्याचे नियमनही करते ! – सर जेम्स जीन्स, खगोलशास्त्रज्ञ
सर जेम्स जीन्स हे केंब्रिज आणि प्रिस्टन विश्वविद्यालयाचे थोर गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आहेत. ग्रेट ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे चिटणीस सांगतात ‘आधुनिक शास्त्र विश्वाच्या चेतनकारण वादाकडे वेगाने धाव घेत आहेत. आता विश्व यंत्रात्मक दिसत नाही, विचारात्मक दिसते. आज अध्यात्माचे स्वागत होते आहे. तोच तर भौतिकता निर्माण करतो आणि त्याचे नियमनही करतो. विश्व हे ‘ईक्षण’ (अवलोकन) आहे. हाच एक शुद्ध विचार आहे. हा ईक्षण करणारा विराट महापुरुष गणितज्ञ असलाच पाहिजे. विश्वाचा विचार करतांना भौतिकाला केवळ अध्यात्माची जोड मिळत आहे, असे नसून भौतिकताच नष्ट होत आहे. भौतिकातील कोणतीच वस्तू शिल्लक रहात नाही. अध्यात्म हीच विश्वाची पार्श्वभूमी आहे.
३. विश्वशक्ती यंत्रात्मक नसून मनाच्या आध्यात्मिक स्वरूपाची आहे ! – कर्टली मॅदर हॉवर्ड, भूस्तर जीव शास्त्रज्ञ
विख्यात भूस्तर जीव शास्त्रज्ञ कर्टली मॅदर हॉवर्ड सांगतात, ‘आज आम्हाला असे आढळून आले आहे की, अणूंच्या मूळ रंगात वावरणारी विश्वशक्ती यंत्रात्मक नसून मनाच्या आध्यात्मिक स्वरूपाची आहे.’
४. या विश्वात जे काही आहे, ते परमेश्वरच आहे ! – सर जेम्स जीन्स, खगोलशास्त्रज्ञ
खगोलशास्त्रज्ञ सर जेम्स जीन्स यांच्या विचारांना फार महत्त्व आहे. त्यांच्या मताप्रमाणे हे विश्व यंत्रात्मक नसून विचाराच्या स्वरूपाचे आहे. ‘वस्तूस्थिती आणि घटनांचे निरीक्षण करतांना असे दिसते की, निर्जीव यंत्राची ही कार्ये आहेत, असे म्हणून त्यांचा उलगडा होणार नाही. या घटना म्हणजे चिन्मयाचे व्यक्त स्वरूप आहे. विश्व ही एक मनाची अभिव्यक्ती आहे. हाच निर्णय द्रव्य आणि शक्ती यांचे अधिकाधिक पृथःकरण करून आम्हाला घ्यावा लागतो. माझी ईश्वरावरील श्रद्धा या स्वरूपाची आहे, मानवातून श्रेष्ठ पुरुष निर्माण करणारे या विश्वात जे काही आहे ते परमेश्वरच आहे. या विश्वात सज्जन असतील, तर त्यांना निर्माण करणारी विश्वशक्ती ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पुण्यशील असलीच पाहिजे.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०२१)