रामराज्यातील पितृशाही आणि आधुनिक लोकशाही !

हिंदु धर्मात पूर्वीपासून मानवता असून मानवाधिकारांचे रक्षण होत आले आहे !

श्री. भारत गुप्त

प्रा. भरत गुप्त हे देहली विश्वविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. ते प्राचीन भारतीय शास्त्रीय तत्त्वज्ञान, संगीत तज्ञ, स्तंभलेखक आणि लेखक आहेत. त्यांच्याशी ‘मानुषी इंडिया’ या यू ट्यूब वाहिनीच्या संपादिका मधुपौर्णिमा किश्वर यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी ‘रामराज्य आणि आधुनिक लोकशाही’ यांविषयी केलेले विवेचन वाचकांसाठी देत आहोत.

१. ‘आगामी काळात लोकशाही ही धनाढ्य लोकांच्या कह्यात जाईल’, हे प्लेटोचे म्हणणे खरे ठरणे

‘जगभरात विविध उणिवा आहेत आणि भयंकर युद्ध होत आहेत. हे सर्व पहाता ‘आधुनिक लोकशाही ही अधिक काळ चालू शकेल’, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ‘लोकशाही कालांतराने धनाढ्य लोकांच्या हाती जाईल’, असे प्लेटोने फार पूर्वीच सांगितले होते. सध्या त्याची लक्षणे आपण पहात आहोत. अमेझॉन, गूगल अशी मोठमोठी आस्थापने चालवणारे लोक हे आधुनिक राजेच आहेत. काहींच्यात तर ‘महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष कोण असावे ?’, हे ठरवण्याची क्षमता आहे. आता अशाच धनाढ्य लोकांच्या हातात सामर्थ्य आले आहे. प्लेटोने म्हटले होते की, ‘लोकशाहीचे पतन होऊन धनाढ्य लोकांची धनशाही येईल आणि ज्यांच्याकडे संपत्ती आहे, त्यांच्याकडे संपूर्ण सत्ता येईल’, हे वाक्य अगदी खरे झालेले दिसते. त्याने म्हटल्याप्रमाणे आपण हुकूमशाहीच्या दिशेने जात आहोत. भारतील लोकशाही पाहिली, तर पूर्वीही अशाच प्रकारची लोकशाही असेल, असेच लोकांना वाटते. पाश्चात्त्यांना प्राचीन ग्रीसमधील लोकशाहीचे कौतुक आहे. त्यांना माहिती नाही की, पूर्वी युनान आणि ग्रीसमध्ये आतासारखी लोकशाही नव्हती. शहरातील केवळ २५ ते ३० टक्के लोक मतदान करत होते. त्यातही कुलीन लोकांचा समावेश होता. महिला आणि नोकर-चाकर यांचा मतदानामध्ये सहभाग नसायचा. ती लोकशाही एकदम वेगळी असून ते काही लोकांचे राज्य होते.

२. भारतात श्रीरामाला आदर्श राजा समजले जाण्यामागील कारण

पूर्वी भारतात असलेल्या वर्णव्यवस्थेवर टीका केली जाते; पण तेव्हा क्षत्रिय राजांच्या हातात सत्ता होती, तेव्हा ते स्वत: कायदे बनवत नव्हते. त्या वेळी धर्मशास्त्र आणि लोकशास्त्र होते. लोकशास्त्र हे समाजातील सामान्य लोक आणि काही विशेष लोकांच्या इच्छेने बनत होते. राजा लोकांच्या मतांचा आदर करत होता. तो लोकांची इच्छा टाळून राज्य करू शकत नसे. वाल्मीकि ऋषींनी म्हटल्याप्रमाणे ‘प्रभु श्रीराम लोकभिरू होते.’ म्हणजे लोकांना काय हवे नको, हे जाणून ते राज्यकारभार करत होते. भारतात आदर्श राज्याची संकल्पना ही कौटिल्याच्या अर्थशास्त्रात दिली आहे; परंतु ‘आदर्श राजा हा प्रभु श्रीरामासारखा असावा’, असेच म्हटले जाते.

स्मरतां हृदि विन्यस्य विद्धं दण्डककण्टकै: ।
स्वपादपल्लवं राम आत्मज्योतिरगात् तत: ॥

– श्रीमद्भागवतपुराण, स्कंध ९, अध्याय ११, श्लोक १९

अर्थ : आपले स्मरण करणार्‍या भक्तांच्या हृदयात, दंडकारण्यातील काटे लागलेले आपले कोमल चरण ठेवून श्रीराम ज्योतिर्मय आत्मरूपात अंतर्धान पावले.

हा श्लोक प्रभु श्रीरामाचे चरित्र आपल्या समोर ठेवतो. श्रीराम दुसर्‍यांसाठी कष्ट उचलतात. त्यांना आपल्या प्रजेचे कल्याण कसे होईल, याचीच चिंता असते; म्हणून त्यांना श्रेष्ठ राजा मानले जाते.

३. राजा आणि प्रजा यांचा संबंध

भारतात राजा आणि प्रजा यांचा संबंध एक प्रकारे पिता अन् पुत्र यांच्यासारखा आहे. ज्याप्रकारे पिता आपल्या पुत्रांना सर्वपरी ठेवतो, त्याप्रमाणे राजा त्याच्या प्रजेची काळजी वहातो. प्रभु श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते. ‘मला प्रजेच्या हितापासून लांब जायचे नाही’, ही श्रीरामाची मर्यादा होती. प्रजा म्हणजे केवळ मनुष्य नाही, तर त्यात पशू, पक्षी, जीव, जंतू, वृक्ष, भूमी, वनसंपदा आणि भूमी यांचा समावेश आहे अन् या प्रजेचे दायित्व घेऊन रक्षण करणे, संवर्धन करणे आणि त्याची देखभाल करणे, हे राजाचे कर्तव्य आहे. हे करत असतांना राजा त्याचे हित पहात नाही. श्रीरामाचे जीवन केवळ त्याचे सुख किंवा दु:ख यांच्यापुरते मर्यादित नव्हते. संत तुलसीदास यांनी लिहिले आहे की, श्रीराम कोण आहे ? ज्याला राज्याभिषेकाची बातमी मिळाल्यावर हर्ष झाला नाही आणि लगेच वनवास मिळाल्यावर दु:खही झाले नाही. जो राजा स्वहितापेक्षा त्याचा धर्म कशात आहे आणि त्याला काय करायचे आहे, एवढेच पहातो, त्यामध्येच असे समत्व येऊ शकते.

४. रामराज्याची संकल्पना !

प्रभु श्रीरामाने जसा राज्याभिषेक स्वीकारला, तसाच वनवासही मान्य केला; म्हणून वाल्मीकि ऋषींनी म्हटले की, श्रीराम हे धर्मशरीर म्हणजेच धर्माची मूर्ती आहे. साक्षात् ईश्वर अवतार घेतो आणि धर्माचरण करतो. हा अवतारही तो स्वत: साठी नाही, तर इतरांसाठी घेतो. श्रीरामाच्या स्थानी ‘मी राजा असलो, तरी हे राज्य माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियांसाठी किंवा कुळासाठी नाही, तर प्रजेसाठी राज्य करत आहे’, अशी भावना आहे. हीच रामराज्याची संकल्पना आहे. रामराज्य हे एक आदर्श उदाहरण आहे. रामराज्यात प्रजेला प्रत्येक प्रकारचे सुख मिळत होते.

५. श्रीकृष्णाच्या राज्यापेक्षा रामराज्य अधिक श्रेष्ठ समजण्यामागील कारण

श्रेष्ठ राजासाठी प्रभु श्रीराम हेच आदर्श असू शकतात. तो भगवान श्रीकृष्णाला आदर्श मानू शकत नाही; कारण श्रीकृष्णाच्या वेळी युग आणि परिस्थिती वेगळी होती. त्या परिस्थितीनुसार त्यांची लीला होती. त्यामुळे ‘रामराज्य’ म्हटले जाते; पण ‘कृष्णराज्य’ म्हटले जात नाही. महाभारत द्वापरयुगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या प्रारंभी घडलेले आहे. त्यामुळे महाभारताच्या चरित्रांमध्ये ती उत्कृष्टता येत नाही. रामायण आणि महाभारत यांच्यात एकच भेद आहे की, रामायणात भाऊ भावासाठी वियोग सहन करतो आणि महाभारतात भाऊच भावाचा विद्रोह करतो. रामायणात रावणाला दुष्ट समजण्यात आले नाही. रामाकडून मारल्या गेल्यानंतर रावणाचा उद्धार होतो आणि त्याला तीच सद्गती मिळते, जी इतरांनाही मिळते. जशी अग्नीच्या सान्निध्यात आलेली वस्तूही अग्नीस्वरूप होते, त्याचप्रमाणे पतित व्यक्तीही ईश्वराच्या सान्निध्यात आल्यावर त्याच परमगतीला प्राप्त होते. रावणाने विरोधीभक्ती केल्यामुळे त्याला सद्गती मिळाली.

६. रामराज्यात समाजाची लोभविरहित स्थिती असल्याने संघर्ष नसणे

मध्ययुगीन काळात चालू झालेल्या मंदिरांच्या विध्वंसामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था नष्ट झाली. राजा शासनकर्ता असला, तरी तो ढवळाढवळ करत नव्हता. लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे जगायचे आणि त्यांच्या धर्माचे पालन करायचे. वाल्मीकि ऋषींनी म्हटल्याप्रमाणे प्रजा ही त्यांची कर्मे आणि धर्म यांत गुंतलेली होती. त्यांना त्यातच आनंद मिळत असल्याने ते संतुष्ट होते. राजा शिक्षा करत असला, तरी प्रजा स्वत:हूनच योग्य आचरण करत होती. हे आचरण त्या राज्यातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र हे चारही वर्णांचे लोक करत होते. ते सर्वजण लोभविरहित होते. कुणालाही कुणाकडून ओरबडून घ्यायचे नव्हते. याला वाल्मीकि ऋषींनी ‘लोभविवर्जिता’ म्हटले आहे. दुसर्‍याची संपत्ती हडपण्याची इच्छाच नसेल, तर समाजात संघर्ष होणारच नाही. हा रामराज्याचा परिणाम होता.

७. प्राचीन काळी यज्ञयाग हे दानधर्म करण्याचे माध्यम असणे

यज्ञयागानिमित्त गरिबांपासून विद्वानांपर्यंत सर्वांना संपत्ती दान करण्यात येत असे. असाच दानधर्म राजपुत्र आणि राजपुत्री यांच्या विवाहाच्या वेळीही केला जात होता. एवढेच नाही, तर विवाहात नाचगाणे करणार्‍यांनाही धनाचे वाटप केले जात होते. वास्तविक यज्ञ हा दानधर्म करण्याचे माध्यम होते. अश्वमेध यज्ञ इतरांवर राज्य करण्यासाठी नाही, तर संपत्तीचे वितरण करण्यासाठी करण्यात येत असे. दान केवळ राजाच करत नव्हता, तर समाजातील लोकही काही विशेष समारंभाच्या निमित्ताने दानधर्म करत असत. ‘मनुष्य लोभी असल्यामुळे त्याचे निवारण करण्यासाठी त्याने नेहमी दान करावे’, असे हिंदु धर्मशास्त्रात सांगितले आहे. भारताच्या इतिहासात महादानी म्हणून राजा शिबी, कर्ण, राजा हरिश्चंद्र आदी अनेक श्रेष्ठ पुरुषांची गणना केली जाते. दानाचा हा धर्म आजच्या लोकशाहीच्या पूर्ण उलट आहे.

८. प्राचीन काळी हिंदु राजांनी पराजित राज्यातील प्रजेला धर्मशास्त्रानुसार वागणूक देणे

मनुस्मृति, याज्ञवल्क्य आदी ग्रंथांमध्ये राजाचे आचरण सांगितले आहे. त्याचे पालन संपूर्ण भारतात होत होते. त्यानुसार जेव्हा विजयी राजा राजधानीत प्रवेश करील, तेव्हा तो सर्वप्रथम लोकांना अभयदान देईल. तो बालक, स्त्री, कलाकार, श्रमिक, धनिक, व्यापारी यांना कोणताही स्पर्श करू शकणार नाही. त्याला राजधानीत केवळ राजकोष कह्यात घेण्याचा अधिकार आहे; पण त्याला राजकुमारींना हात लावण्याचा अधिकार नाही. त्याला जर राजधानीच्या प्रमुख मंदिरातील मूर्तीला घेऊन जायचे असेल, तर त्याला त्याच्या राज्यात जुन्या मंदिराहून भव्य मंदिर बनवावे लागेल. राजाला पराजित राज्यातून मोठमोठे कलाकार किंवा विद्वान यांना बलपूर्वक नाही, तर आमंत्रण द्यायचे आणि त्यानंतर त्यांची इच्छा असेल, तर ते त्या राजांच्या राजधानीमध्ये जात, उदाहरणार्थ काश्मीरमध्ये ७ व्या शतकात अनेक मोठमोठे विद्वान गेले. ते सर्व उत्तरप्रदेशातूनच गेले होते. ही प्रक्रिया सतत चालू होती. पराजित झालेल्या राजाच्या संपत्तीला ‘हाल ए गनिमत’ समजण्यात येत नव्हते. त्याचे हिंदु संस्कृतीत एकही उदाहरण मिळत नाही. काही तुरळक उदाहरणे मिळतात; पण ते दुष्ट समजण्यात येत होते आणि त्यांचा संहार करण्यात येत होता.’

– प्रा. भरत गुप्त (२३.१०.२०२२)

आधुनिक लोकशाहीहून भारताची प्राचीन राज्यव्यवस्था अधिक श्रेष्ठ ! – मधुपौर्णिमा किश्वर, संपादिका, ‘मानुषी इंडिया’ यू ट्यूब वाहिनी

मधुपूर्णिमा किश्वर

समाज व्यवस्थित नसेल, तर रामराज्य येऊ शकत नाही. प्रजेचे पालन करणे आणि त्यांचे बाहेरील शत्रूपासून रक्षण करणे, तसेच शांती अन् समृद्धी कायम ठेवणे, हे राजाचे प्रमुख कर्तव्य आहे. पूर्वी मोठमोठे यज्ञ करून प्रतिवर्षी खजाना रिकामा केला जायचा. त्यांच्याकडून कोणताही याचक विन्मुख जात नसे. दानधर्म हा राजाचा धर्म समजला जायचा. याउलट पाश्चात्त्य देशांतील राजांची स्थिती होती. भारतीय राजे स्वतःचे महाल भव्य बांधत नव्हते; पण मंदिरे भव्य बांधायचे.

हिंदु धर्मात सामाधानाला सर्वांत मोठे धन समजण्यात येते. लोकशाहीत प्रत्येकाला दुसर्‍याला हरवून वर जायचे आहे. रामराज्यात राजा राज्य करतो; पण जनतेच्या कामात ढवळाढवळ करत नाही. तथाकथित लोकशाहीत निवडून आलेला उमेदवार निवडणुकीतील त्याचा व्यय परत मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ‘सत्ता मिळाली, म्हणजे लुटण्याचा परवाना मिळाला’, असे समजण्यात येते. सध्या लोकशाहीत जात, भाषा, प्रदेश यांच्या नावावर निवडणुका लढवल्या जातात. लोकशाहीत सतत टोळीयुद्धासारखी स्थिती असते. प्राचीन काळी विशेषतः महाभारत काळात कटकारस्थाने होती; पण तीही एका मर्यादेपर्यंत होती. आता सर्व मर्यादेपलीकडे गेले आहे. सर्वत्र समाजाला तोडण्याचे काम चालू आहे.

आधुनिक लोकशाहीचे समर्थक भारतियांना मानवाधिकार, मानवता वगैरे शिकवण्याचा प्रयत्न करतात. हिंदु धर्मात पूर्वीपासून मानवता असून मानवाधिकारांचे रक्षण होत आले आहे. पूर्वी नियमानुसारच युद्धे होत होती. आधुनिक काळात शहरे जाळली जातात. मानवतेची प्रचंड हानी होते. लोकशाहीच्या माध्यमातून धर्मांतर, ‘सर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे), मतपेढी बनवून ‘ब्लॅकमेल’ करणे, असे उघडपणे प्रकार चालू आहेत. त्यामुळे ‘लोकशाही ही आपल्या गळ्यातील धोंडा बनली आहे’, असेच म्हणावे लागते.