आज १२ नोव्हेंबर २०२२ या दिवशी पंडित मदनमोहन मालवीय यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
‘कार्तिक कृष्ण चतुर्थी या दिवशी (१२ नोव्हेंबर १९४६ या दिवशी) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुढारी, वाराणसीच्या विख्यात हिंदु विश्वविद्यालयाचे जनक आणि कळकळीचे सार्वजनिक कार्यकर्ते पंडित मदनमोहन मालवीय यांचे निधन झाले !
एका ब्राह्मण घराण्यात अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण संपल्यावर गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये थोडे दिवस शिक्षकाचे काम केल्यावर मालवीय यांनी ‘हिंदुस्थान’ नावाचे वृत्तपत्र काढले. त्यांनी पुढे ‘इंडियन युनियन’, ‘अभ्युदय’, ‘लिडर’, ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्रांचे संपादकत्व वेळोवेळी स्वीकारले होते. वर्ष १८८५ मध्ये कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनामध्ये त्यांनी पहिले राजकीय भाषण केले. लाहोर, देहली आणि कोलकाता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनांचे अध्यक्षपद पंडित मदनमोहन मालवीय यांना मिळाले होते. वर्ष १९०२ मध्ये प्रांतिक संसद आणि वर्ष १९१० मध्ये मध्यवर्ती संसद येथे ते निवडून गेले. मालवीय हे हिंदु महासभेच्या संस्थापकांपैकी एक असून प्रयाग आणि पुणे येथे झालेल्या अधिवेशनांचे ते अध्यक्षही होते. त्यांनी बनारस हिंदु विश्वविद्यालयाचा पाया घातला. हिंदु संस्कृतीच्या अभ्यासासह इतर आधुनिक ३० शाखांचे शिक्षण देणारे हे विद्यापीठ जगप्रसिद्ध आहे. स्नानसंध्या, गीताभागवतादिकांचा नित्य व्यासंग, शुचिर्भूत वृत्ती, कपाळी चंदनाचा ठसठशीत टिळा, देश आणि धर्म यांविषयी काम करण्याची तत्परता या गुणांमुळे मालवीय यांच्याविषयी सर्वांना आदर वाटे. विरोधकही मालवीय यांना अधिक मान देत असत. हृदयाचे मृदु, तत्त्वाचे खंबीर, धार्मिकतेची मूर्ती अशा व्यक्तित्त्वामुळे ते अतिशय पूज्य वाटत.’
(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’, लेखक : प्रल्हाद नरहर जोशी)