ज्ञानवापीतील शिवलिंगाच्या संरक्षणाशी संबंधित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी देहली – वाराणसीतील ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाच्या संरक्षणाशी  संबंधित याचिकेवर ११ नोव्हेेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ‘खंडपीठ’ स्थापन करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

१. या प्रकरणातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनाची नोंद सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपिठाने घेत म्हटले की, या प्रकरणातील संरक्षण आदेशाची मुदत १२ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबरला आम्ही खंडपीठ स्थापन करू.

२. सर्वोच्च न्यायालयाने १७ मे या दिवशी अंतरिम आदेश देत वाराणसी जिल्हादंडाधिकार्‍यांना ज्ञानवापीमधील शिवलिंगाची सुरक्षा निश्‍चित करण्याचे निर्देश दिले होते, तसेच मुसलमानांना नमाजपठण करण्याची अनुमती दिली होती. त्यानंतर आता ११ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.