संभाजीनगर येथे ‘हर हर महादेव’ चित्रपट चालू करण्यावरून मनसे-संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांमध्ये वाद !

संभाजीनगर – शहरातील फेम तापडिया चित्रपटगृहात ९ नोव्हेंबर या दिवशी ‘हर हर महादेव’ चित्रपट चालू करण्यावरून मनसे-संभाजी ब्रिगेड संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मनसेकडून चित्रपट पुन्हा चालू करण्याची मागणी करण्यात आली असून संभाजी ब्रिगेडने याला विरोध केला आहे.

चित्रपटगृहात मनसे आणि संभाजी ब्रिगेड यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेगळे करत कह्यात घेतले. चित्रपटगृहाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

मनसेचे नेते आशिष सुरडकर म्हणाले की, ८ नोव्हेंबर या दिवशी फेम तापडिया चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना याविषयी विचारणा केल्यानंतर त्यांनी चित्रपट चालू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार हा चित्रपट चालू असून शेवट होईपर्यंत आम्ही येथेच थांबलो आहोत. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना कुणीही जुमानत नसून त्यांचा चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे.