कॉन्व्हेंट शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालये येथे अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

हिंदु जनजागृती समितीचे कागल येथे निवेदन

कागल येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती रूपाली सूर्यवंशी-बरगे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कागल (जिल्हा कोल्हापूर) – राज्यातील चर्चप्रणीत अनाथालये, तसेच कॉन्व्हेंट शाळा येथे अल्पवयीन मुली, तसेच विद्यार्थी यांचे लैंगिक शोषण होत आहे. अनेक शहरांत कॉन्व्हेंट शाळा चालवणारे बिशप आणि फादर हे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याच्या अनेक पालकांच्या तक्रारी आहेत. तरी कॉन्व्हेंट शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालये येथे अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कागल येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती रूपाली सूर्यवंशी-बरगे यांना देण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे श्री. धनाजी नागराळे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रमोद आरेकर, अमोल धुमाळ, रुद्राप्पा पाटील, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.

या प्रसंगी करण्यात आलेल्या मागण्या

१. अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक आणि अन्य प्रकारचे अत्याचार करणे, हे पॉक्सो कायद्यानुसार, तसेच ‘बाल हक्क संरक्षण कायदा २००५’ नुसार गंभीर गुन्हे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कॉन्व्हेंट शाळा आणि चर्चप्रणीत अनाथालये यांमध्ये अत्याचार होत नाहीत ना ? हे पडताळण्यासाठी पत्रकार, समाजसेवक, पोलीस, महिला, निवृत्त न्यायाधीश आणि शासकीय अधिकारी यांचे एक ‘विशेष तपास पथक’ नेमून शाळांची चौकशी करण्यात यावी.

२. अशा घटनांच्या संदर्भात ज्या पालकांनी पूर्वी तक्रारी दिल्या आहेत; मात्र त्यांवर कारवाई झालेली नाही. त्या प्रकरणी पुन्हा चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

३. अल्पवयिनांवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या कॉन्व्हेंट शाळा आणि चर्चप्रणीत अनाथालये यांच्या विश्वस्त मंडळांवर गुन्हे नोंद करून त्या संस्थांची मान्यता रहित करण्यात यावी.

संपादकीय भूमिका

लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर कारवाईची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !