शिक्षणातून अध्यात्माला वगळून केवळ रोजगार देणारे साधन केल्याने झालेला दुष्परिणाम !

‘आज उपजीविकेसाठी व्यक्तीला योग्य बनवण्याच्या प्रक्रियेला ‘शिक्षण’ म्हटले जाते. आजचे शिक्षण तर आम्हाला केवळ (पोट भरणारे) रोजगार देऊ शकते. जसजसे रोजगार परत्वे शिक्षण वाढत जाते, तसतशी नैतिकता घटत चालली आहे. आपण एका आंधळ्या शर्यतीत उभे राहून सर्वांना मागे टाकून पुढे जाऊ पहातो. समाजातील वाढता भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, चोर्‍या, अपहरण, क्रोधात कुणाचे तरी प्राण घेणे आदी घटना नित्याच्याच  झाल्या आहेत. शिक्षणाचे मूल्य जाणून त्यात अध्यात्म अंतर्भूत करण्याऐवजी त्या ठिकाणी आपण शिक्षणाला केवळ उपजीविकेचे साधन बनवले आहे. आजचे शिक्षण आम्हाला एक चांगला मानव बनण्याची प्रेरणा देत नाही, तर ते आम्हाला आत्मकेंद्रित आणि भौतिकवादी बनवते आहे.

आजचा विद्यार्थी जसजसा शिक्षित होत जातो, तसतसा तो देश, समाज आणि कुटुंब यांपासून तुटत चालला आहे अन् सर्वांत शेवटी तो आपल्या स्वतःपासूनही तुटतो. पुढे याचे प्रमाण इतके वाढते की, त्यांना आपल्या परंपरा, प्राचीन ज्ञान भांडार, संस्कृती आदींचे ज्ञानच होत नाही. आजच्या शिक्षणामध्ये मानवीय मूल्ये, संस्कार इत्यादींवर काहीच भर दिला जात नाही. उलट त्याला असे शिक्षण दिले जाते की, व्यक्तीने अधिकाधिक धनसंपत्ती कमवून वैभवात रहायला हवे, त्यासाठी त्याला मूलभूत सिद्धांतांचा बळी द्यावा लागला, तरी हरकत नाही. खरे तर शिक्षण व्यक्तीचा आंतरिक विकास करण्याची आणि मनुष्याचे श्रेष्ठ मानवात रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे.’

(संदर्भ : ‘मासिक संस्कारम्’, मार्च २०१८)