गोव्यात सरकारी नोकरीसाठी आता १ – २ वर्षांचा अनुभव असणे सक्तीचे ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

नोकरीसाठी मंत्री आणि आमदार यांच्या दारासमोर रांगा लावाव्या लागणार नाहीत, तर कर्मचारी नोकरभरती आयोगाच्या माध्यमातून नोकरी मिळणार

‘मेगा नोकरभरती मेळाव्या’च्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – सरकारी नोकर्‍या घोषित झाल्यानंतर उमेदवार नोकरीसाठी मंत्री किंवा आमदार यांच्या घराबाहेर रांगा लावतात; मात्र आता हे बंद होणार आहे. जानेवारी २०२३ पासून सर्व सरकारी नोकर्‍यांसाठीची निवड कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून केली जाणार आहे, तसेच सरकारी नोकरीसाठी आता १ – २ वर्षांचा अनुभव असणे सक्तीचे असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ताळगाव येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात कामगार खात्याच्या वतीने आयोजित ‘मेगा नोकरभरती मेळाव्या’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

या वेळी कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात उपस्थित होते. ‘मेगा नोकरभरती मेळाव्या’त १८ सहस्रांहून अधिक उमेदवारांनी नावनोंदणी केली आहे आणि १५५ खासगी आस्थापने सुमारे ५ सहस्र ५०० नोकर्‍या उपलब्ध करणार आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘२० टक्के सरकारी कर्मचारी हे कामचुकार आहेत. त्यामुळे असे करणार्‍यांना आता सक्तीने घरी जावे लागणार आहे. जनतेला चांगल्या आणि जलद गतीने सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यामध्ये कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. ‘स्वच्छता, सुरक्षारक्षक आदी काम करणार्‍यांना पोलीस, अग्नीशमन दल आणि वन खाते यांमध्ये २ टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. उत्तर गोव्यात ‘मेगा नोकरभरती मेळाव्या’ला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर अशाच प्रकारचा मेळावा दक्षिण गोव्यातही आयोजित करण्यात येणार आहे.’’