गोवा : डाव्या विचारसरणीच्या वक्त्यांचा भरणा असलेला डी.डी. कोसंबी विचार महोत्सव विरोधामुळे स्थगित

कला आणि संस्कृती खाते महोत्सवाचा दिनांक नव्याने घोषित करणार

पणजी, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याने मडगाव येथील रवींद्र भवन येथे १० ते १४ नोव्हेंबर या कालावधीत डी.डी. कोसंबी विचार महोत्सवाचे आयोजन केले होते. सरकारने हा महोत्सव स्थगित ठेवून महोत्सवाचे दिनांक नव्याने घोषित करणार असल्याचे म्हटले आहे. महोत्सवात मोदी सरकारवर सातत्याने टीका करणार्‍या डाव्या विचारसरणीच्या विचारवंताचा वक्ते या नात्याने सहभाग असल्याने भाजपचे काही कार्यकर्ते आणि विचारवंत यांनी या वक्त्यांच्या निवडीवर सरकारकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे समजते.

डी.डी. कोसंबी विचार महोत्सवात गोव्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तथा ‘दक्षिणायन अभियान’शी निगडित दामोदर मावजो, देहली येथील प्राध्यापिका माधवी मेनन, मुंबई येथील डॉ. देवदत्त पटनाईक, केंब्रिज (अमेरिका) येथील हारवर्ड विद्यापिठाचे विचारवंत डॉ. सूरज येंगडे आणि देहली येथील लेखक प्रा. प्रणय लाल यांची व्याख्याने होणार होती. महोत्सवाच्या काळात परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचा महोत्सवाला अल्प प्रतिसाद लाभत आहे आणि महोत्सवाचे आयोजन होत असलेल्या मडगाव येथील रवींद्र भवन येथे सुशोभिकरणाचे काम चालू असल्याने महोत्सव तूर्तास स्थगित केल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

सरकारच्या निर्णयावर डाव्या विचारसरणीच्या लोकांची टीका

सरकारच्या या निर्णयाविषयी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो म्हणाले, ‘‘हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे.’’ महोत्सव स्थगित ठेवल्याने ‘दक्षिणायन अभियान’ या डाव्या विचारसरणीच्या प्रागतिक विचारवंतांनी सरकारवर टीका केली आहे.

सरकारने अनुत्तरित प्रश्नांचा खुलासा करावा ! – युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

महोत्सव पुढे ढकलल्याच्या कृतीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी महोत्सव अखेरच्या क्षणी रहित केल्याच्या कारणाविषयी खुलासा करावा आणि याला उत्तरदायी असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.