नागपूर येथे विकलांग विद्यार्थ्याला शिक्षिकेने १ घंटा उन्हात उभे केले !

पालकांनी खडसावल्यावर विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले !

नागपूर – येथील एका खासगी शाळेमध्ये शिक्षिकेने अर्णव राठोड या इयत्ता ५ वीतील विकलांग मुलाला १ घंटा उन्हामध्ये उभे केले. यामुळे विद्यार्थ्याची प्रकृती खालावली असून आई-वडिलांनी शाळा प्रशासनाला याविषयी खडसावले; परंतु शाळा प्रशासनाने अर्णवला याला शाळेतून काढून टाकले आहे. यामुळे त्याला मानसिक धक्का बसला आहे.

अर्णवला जन्मजात ‘सेरेबल पालसी’ हा आजार आहे. त्यामुळे त्याला चालतांना नीट तोलही सांभाळता येत नाही. काही वेळानंतर त्याला आधाराची आवश्यकता असते. शाळेत खेळाच्या तासिकेला सर्व विद्यार्थी खाली बसले होते; पण अर्णवला खाली बसता येत नाही. त्यामुळे त्याला आसंदीची आवश्यकता होती. एका विद्यार्थ्याने खोडी काढली. त्यामुळे सर्व विद्यार्थी हसायला लागले; परंतु अर्णवनेच खोडी काढल्याचे शिक्षिकेला वाटून त्यांनी वरील प्रकार केला.

अर्णवच्या आई-वडिलांनी या प्रकरणी पोलीस आणि गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. शाळा प्रशासनाने या घटनेची अंतर्गत चौकशी चालू केली असून ‘शिक्षिका दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल’, अशी माहिती दिली.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांविषयी जराही संवेदनशीलता नसणारे असे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ?