सांगली येथील निर्धार फौंडेशनच्या वतीने चंद्रभागा नदीच्या परिसराची स्वच्छता !

अध्यक्ष राकेश दड्डणावर यांच्यासह १०० स्वच्छता दूतांचा सहभाग

चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करतांना निर्धार फौंडेशनचे कार्यकर्ते

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ८ नोव्हेंबर (वार्ता.) – कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने येथे चंद्रभागा तीरावर निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांच्यासह १०० स्वच्छता दूत यांनी ३ टन कचरा संकलन करून घाट परिसर स्वच्छ केला. श्री विठ्ठलाच्या चरणी एक वेगळ्या पद्धतीने भक्ती अर्पण करावी, तसेच प्रशासनाला सहकार्य या दोन्ही हेतूने राकेश दड्डणावर यांनी ‘सांगलीची स्वच्छता वारी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारी’ ही आगळीवेगळी मोहीम हाती घेतली.

१. राकेश दड्डणावर म्हणाले, ‘‘६ नोव्हेंबर या दिवशी पंढरपूर येथे जाऊन ५ घंटे श्री विठ्ठल मंदिराचा परिसर आणि चंद्रभागा नदीच्या काठावरील निर्माल्य आणि कचरा संकलन करून घाटांची स्वच्छता केली. या मोहिमेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सेवाभावी वृत्तीने स्वच्छता केली. स्थानिक प्रशासनाकडून एक जेसीबी आणि मोठा कंटेनर कचरा उचलण्यासाठी मिळाला होता.’’

२. मनोहर सारडा म्हणाले की, सांगलीहून पंढरपूरला स्वच्छतेसाठी १०० जण जाणे हे कौतुकास्पद आहे. राकेश आणि त्यांच्या गटाचे काम उल्लेखनीय असून आम्ही यापुढे त्यांना सढळ हाताने साहाय्य करत राहू. मोहीमेत सहभागी झालेल्यांसाठी विविध मान्यवरांनी अल्पाहार आणि भोजन यांची व्यवस्था केली.

३. या अभियानात भारत जाधव, अपर्णा कोळी, मेघा मडीवाळ, वर्षा जाधव, नीलेश लोकरे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, सचिन ठाणेकर, रोहीत कोळी, सविता शेगुणशी यांसह अन्य सहकारी सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका

असे उपक्रम सामाजिक संघटनांना का राबवावे लागतात ? प्रशासन काय करते ? असा प्रश्न कुणाला पडल्यास चूक ते काय ?