इतरांना आधार देणार्‍या आणि श्रीकृष्णाप्रती भाव असलेल्या सनातनच्या १०२ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार !

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार
सौ. नंदा बिहाडे

१. समंजस

‘श्रीमती मंदाकिनी विजय डगवार ही माझी मोठी बहीण आहे. ताई लहानपणापासून समजूतदार असून सर्वांना सांभाळून घेते. आम्ही लहान असतांना ती घरातील सर्व दायित्व सांभाळत असे.

२. ताईला भेटण्याची ओढ वाटणे

अ. ताई पूर्वीपासूनच सात्त्विक आहे. तिच्यामध्ये पूर्वीपासूनच श्रीकृष्णाप्रती भाव आहे. ती नेहमी कपाळावर कुंकू लावायची. ती नोकरी करायची. ती घरी आल्यावर सगळ्यांच्या अडचणी जाणून घ्यायची. मला ती पुष्कळ आवडायची. त्यामुळे मी सतत ताईच्या मागे रहात असे.

आ. ताई पदविकेचे शिक्षण घेत असतांना वर्धा येथे छात्रालयात रहात होती. त्या वेळी मी लहान होते. आमचे बाबा ताईला भेटायला वर्धा येथे जाण्यासाठी निघाल्यावर मीही ताईला भेटण्यासाठी त्यांच्याकडे हट्ट करायचे. एकदा ते मला ताईकडे घेऊन गेले. ताईला बघून मला पुष्कळ आनंद झाला. ताईने मला तेव्हा श्रीकृष्णाचा खाऊ, म्हणजे दूधपोहे करून दिले. दूधपोहे खाऊन मला अतिशय आनंद झाला.

३. स्वीकारण्याची वृत्ती

ताईला नोकरी लागली. तेव्हा मी ताईजवळ एक मास राहिले. प्रारंभी ताई मागास भागातील एका खेड्यात नोकरी करत होती. तेव्हा ताईतील दैवी गुणांमुळे तिने तेही परिश्रम आनंदाने केले. मी ताईला कधी चिडतांना पाहिले नाही. ताईने त्या गावाशी आणि तेथील मुलांशी जुळवून घेतले.

४. ताईचे सासरे ताईशी आदराने बोलायचे.

५. बहिणीला कला शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे

माझी दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी काही दिवस ताईकडे रहायला गेले होते. त्या वेळी तिने मला विविध कलांच्या शिकवणी वर्गांत घातले.

६. कौटुंबिक कर्तव्ये निभावणे आणि नातेवाइकांना साधना सांगणे

आम्ही एकूण ५ बहिणी आहोत. ताई सर्वांच्या अडचणी जाणून घेऊन सर्वांना साहाय्य करायची. आम्हा बहिणींच्या लग्नाची सिद्धता आदी सर्व तिला करावे लागले. माझे लग्न वर्ष १९९७ मध्ये झाले. तेव्हा मला पुष्कळ त्रास होता. मी गर्भवती राहिले, तेव्हा ती मला नामजप, गर्भसंस्कार यांविषयी सांगायची. वर्ष १९९८ मध्ये मला मुलगी झाली. तेव्हा ताई मला भेटायला लगेच आली. ताईने माझ्या बाळाला घेतले. तेव्हा तिने बाळाच्या कानात मोठ्याने नामजप म्हटला आणि मलाही नामजप करायला सांगितला. तेव्हापासून मी सातत्याने नामजप करते. माझी मुलगी ७ मासांची असल्यापासून मी सत्संगाला जात असे. ताईमुळे आम्ही सर्व कुटुंबीय साधनेत आहोत. ताई आम्हा भावंडांच्या मुलांशी प्रेमाने बोलते. काही अडचण आल्यास माझी मुले ‘मावशीला अडचण सांगितली का ? मावशी काय म्हणाली ?’, असे विचारतात.

७. अमित आणि मयुरी ही ताईची २ मुलेही पुष्कळ सात्त्विक आहेत. आमच्या पाचही जणींच्या मुलांपुढे त्यांचा आदर्श आहे.

८. यजमानांच्या निधनानंतर स्थिर असणे

ताईच्या यजमानांचे अकस्मात् निधन झाल्यावर आम्हा सर्वांना अतिशय धक्का बसला. ताईचे यजमान तिची पुष्कळ काळजी घ्यायचे. ते सर्व दायित्व पार पाडत असत. ताईला त्यांचा पुष्कळ आधार होता. त्या दोघांचे नाते आध्यात्मिक स्तरावरचे होते. ती यजमानांमध्ये देवाचे रूप बघायची. ‘त्यांच्या जाण्यामुळे ताई मनातून खचलेली असावी’, असे आम्हाला वाटले; मात्र ताई पुष्कळ स्थिर वाटत होती.

९. कर्तेपणा देवाला देणे

मी ताईच्या यजमानांच्या निधनानंतर २ मासांनी ताईकडे गेले. तेव्हा मला ताईकडे पाहून पुष्कळ वाईट वाटले. ताईने ‘आता माझ्याकडून पूर्वीसारखी साधना होत नाही’, अशी खंत बोलून दाखवली. तेव्हा ‘‘तू पूर्वीसारखीच साधना करत आहेस. तू सर्व सांभाळून करत आहेस, हीच तुझी साधना आहे’’, असे मी तिला सांगितले. तिला व्यावहारिक कामे करतांना अनेक अडचणी आल्या; पण तिने देवावर सोपवून सर्व कामे केली, तसेच कर्तेपणही देवाला दिले. तिची व्यावहारिक कामे लवकर पूर्ण झाली आणि शेवटी तिचा आश्रमात जायचा दिवस उजाडला.

१०. ताईमुळे आम्हाला पुष्कळ शिकायला मिळाले.’

(लेखातील सूत्रे पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार संतपदी विराजमान होण्यापूर्वीची असल्याने त्यांना ‘पूज्य’ असे संबोधले नाही.)

– सौ. नंदा बिहाडे (लहान बहीण ), चंद्रपूर (१५.५.२०२१)