बांगलादेशी युवतींची गोव्यात तस्करी
पणजी, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत गोव्यात १६ टक्के विदेशी, तर उर्वरित ८४ टक्के भारतीय युवती यांची वेश्याव्यवसायासाठी तस्करी करण्यात आली. विदेशी युवतींमध्ये बांगलादेशी युवतींचे प्रमाण सर्वाधिक होते, तर हे प्रमाण सातत्याने वाढत आहे. देशभरात सर्वाधिक महाराष्ट्र आणि त्यानंतर बंगाल अन् देहली येथून युवतींची गोव्यात वेश्याव्यवसायासाठी तस्करी केली जाते, अशी माहिती वेश्या व्यवसायात अडकलेल्या युवतींचे पुनर्वसन करणार्याचे कार्य करणार्या ‘अन्याय रहित जिंदगी’ या अशासकीय संघटनेचे संचालक अरुण पांडे यांनी दिली. गोवा पोलिसांनी मानवी तस्करीच्या विरोधात आयोजित केलेल्या एका राज्यस्तरीय चर्चा सत्रात अरुण पांडे बोलत होते. या चर्चासत्रात पोलीस अधिकारी, अधिवक्ता आणि सरकारी अधिवक्ता आदींनी मानवी तस्करीला अनुसरून त्यांचे अनुभवकथन केले.
संचालक अरुण पांडे पुढे म्हणाले, ‘‘एन्.सी.आर्.बी.’ या शासकीय संस्थेने मानवी तस्करीला अनुसरून प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशभरात लोकसंख्येच्या तुलनेत दरडोई उत्पन्न अधिक असलेल्या राज्यांमध्ये मानवी तस्करीचे गुन्हे गोव्यात सर्वाधिक नोंद झालेले आहेत; मात्र दु:खदायक गोष्ट अशी की, गोव्यात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण एकदम नगण्य आहे.’’
वेश्याव्यवसायात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य असण्यामागील कारण स्पष्ट करतांना पोलीस निरीक्षक राहुल परब म्हणाले, ‘‘पीडितांचे असहकार्य असणे, पीडितांनी न्यायालयातसाक्ष देण्यासाठी न येणे आणि पीडितांचे दलालांना सहकार्य असणे आदींमुळे गुन्हेगारांना शिक्षा होणे कठीण बनते.’’
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. आन्द्रे फर्नांडिस म्हणाले, ‘‘पीडित वैद्यकीय तपासणीसाठी सिद्ध नसतात आणि बळजोरीने वैद्यकीय तपासणी करणे शक्य नसते. यामुळे अशा प्रकारच्या घटनांतील गुन्हेगारांच्या विरोधात पुरावा रहात नाही.’’
उपविभागीय न्यायदंडाधिकारी गुरुदास देसाई म्हणाले, ‘‘मानवी तस्करीच्या प्रकरणी अधिवक्त्यांची सेवा विनामूल्य असूनही काही अधिवक्ते पीडित कुटुंबांचे आर्थिक शोषण करत असतात.’’ सरकारी अधिवक्त्या मिलेना गोम्स इ पिंटो म्हणाल्या,‘‘आपली यंत्रणा फारच सुस्तपणे कार्य करते आणि पीडितांचे पुनर्वसनही केले जात नाही. पुनर्वसनासाठी मी २० अर्ज केले होते; मात्र त्यातील केवळ १ अर्ज संमत झाला.’’