नवी मुंबई विमानतळासाठी होणार्‍या सुरुंगाच्या कामामुळे १०० घरांना तडे !

सुरूंग लावण्याचे काम बंद न केल्यास विमानतळाचे काम बंद पाडण्याची चेतावणी

नवी मुंबई विमानतळासाठी होणार्‍या सुरुंगाच्या कामामुळे १०० घरांना तडे

नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामासाठी टेकड्यांचे सपाटीकरण करण्यात येत आहे. यासाठी सुरूंग (‘बोअर ब्लास्टिंग’) लावण्यात येतो.  त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भूकंपासारखे हादरे बसतात. याचा परिणाम म्हणून वहाळ गावातील अनुमाने १०० घरांना तडे गेले आहेत. यामुळे रहिवासी भयभीत झाले असून ‘सुरूंग लावण्याचे काम बंद न केल्यास विमानतळाचे काम बंद पाडू’, अशी चेतावणी वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा पाटील यांनी सिडकोला दिली आहे. विमानतळाचे काम करणार्‍या ठेकेदाराला पेट्रोलियम तसेच विस्फोटक सुरक्षा विभागाने ‘कंट्रोल ब्लास्ट’ करण्याच्या सूचनाही केल्या आहेत; मात्र दुपारच्या वेळी ‘बोअर ब्लास्टिंग’ करतांना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक  स्फोटकांचा वापर केला जातो, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळे वित्त आणि जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी सिडकोचे विमानतळ विभाग आणि पोलीस ठाणे येथे तक्रार केली आहे.  ‘या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत’, अशी माहिती प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.