कोल्हापूर येथील पंचगंगा नदीघाटाची दुरवस्था : महापालिका प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांचे दुर्लक्ष

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीचा घाट

कोल्हापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – कोल्हापूरची ओळख तशी दक्षिण काशी म्हणून आहे. पंचगंगा ही येथील प्रसिद्ध नदी; मात्र या नदीच्या घाटाची सध्या दुरवस्था झालेली आहे. घाटाच्या पायर्‍या फुटलेल्या आहेत. घाट परिसरात अनेक प्राचीन मंदिरे असून त्यांचे संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. घाट परिसरात असणार्‍या मंदिरांचे दगडी बांधकामही ढासळत आहे. येथील परिसरात अस्वच्छता असून महापालिकेने बांधलेले स्वच्छतागृह सध्या बंद अवस्थेत आहे. पुरातत्व विभागालाही या परिसराशी काही देणेघेणे नाही. वास्तविक येथील प्रत्येक मंदिरासमोर, तसेच परिसरात प्रत्येक गोष्टीची माहिती देणार्‍या पाट्या आवश्यक आहेत.

पंचगंगा नदीवरील घाटाची झालेली दुरवस्था
नदीकाठावरील भंगलेली शिवपिंड
पंचगंगा नदीघाटावरील महापालिकेने बांधलेले बंद अवस्थेतील स्वच्छतागृह

७ नोव्हेंबरला येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मोठी आरती केली जाणार आहे. हा घाट दिव्यांनी उजळून जातो; मात्र हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अथवा जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाहीत.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पंचगंगेच्या घाटावर केली जाणारी मोठी आरती

या घाटावर सध्या भाविक श्री. स्वप्नील मुळे हे वर्ष २०११ पासून श्रीकृष्ण मंदिरात निरपेक्षपणे नित्यनेमाने आरती करत आहेत.

या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. स्वप्नील मुळे म्हणाले,

श्री. स्वप्नील मुळे

‘‘वर्ष २००९ मध्ये कै. पांडुरंग चिले यांनी प्रथम ही आरती चालू केली, तसेच यानंतर नेटाने कै. श्रीकृष्ण जिल्हेदार यांनी ही आरती चालू ठेवली. प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता आम्ही ही आरती करतो. यात प्रथम श्री गणेशाची आरती, नंतर श्रीकृष्ण, श्री दक्षिणकाशी श्रीकरवीरपुराची आरती, श्री पंचगंगा मातेची आरती आणि श्री हनुमानाची आरती करतो. यानंतर प्रार्थना, मंत्रपुष्पांजली, तसेच श्रीपंचगंगामातेचे प्रार्थनास्तोत्रही म्हणतो. या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असूनही आरतीसाठी पुष्कळ अल्प प्रमाणात भाविक येथे उपस्थित असतात. ज्याप्रमाणे गंगा नदीच्या घाटावर नदीची आरती मोठ्या प्रमाणात होते, त्याप्रमाणे येथेही तशी आरती व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. याकडे सध्या शासन आणि प्रशासन यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.’’