राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची संपत्ती जप्त होणार !

मुंबई – सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्याची अनुमती ‘अंमलबजावणी संचालनालया’ला (‘ईडी’ला) मिळाली आहे. त्यामुळे मलिक आणि त्यांचे नातेवाईक यांची संपत्ती शासनाधीन होणार आहे. एप्रिल मासात ईडीने मलिक यांच्या कुटुंबाची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली होती. अधिनिर्णय प्राधिकरणाने आता या जप्तीला संमती दिली आहे.  ही मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबीय, ‘सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘मलिक इन्फ्रास्ट्रक्चर’ या आस्थापनांशी संबंधित आहेत.

आतंकवादी दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसना पारकर हिच्याशी संबंधित पैशांची अफरातफर (मनी लाँड्रींग) केल्याप्रकरणी अटकेत असलेले मलिक हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.


काय आहे प्रकरण ?

हसीना पारकर, सलीम पटेल, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक या चौघांनी गोवावाला कंपाऊंडमधील भूमी अनधिकृतपणेे घेतली. हसीना पारकर हिच्या सूचनेनुसार ती मलिक यांच्या ‘सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ आस्थापनाला विकली. मलिक यांनी ही जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून सध्या जप्त करण्यात आलेली मालमत्ता खरेदी केली होती. नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमधील भूमी ही कायदेशीर मार्गाने खरेदी केल्याचा दावा केला आहे.