(म्हणे) ‘पंजाब दौर्‍यात अनुचित प्रकार घडल्यास त्याला तुम्हीच उत्तरदायी असाल !’

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ची पंतप्रधान मोदी यांना धमकी

खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू

अमृतसर (पंजाब) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ नोव्हेंबरला पंजाबच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी अमृतसर येथे राधास्वामी डेराच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यापूर्वी ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने मोदी यांना ‘डेरा प्रमुखांना भेटू नका’, अशी धमकी दिली. मोदी हे शेतकर्‍यांचे मारेकरी असल्याचे पन्नूचे म्हणणे आहे. ‘जर डेरा प्रमुखांशी भेटलात आणि या वेळी काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला तुम्ही उत्तरदायी असाल’, अशी धमकीही त्याने दिली. पन्नू याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्याने शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांच्या हत्येचाही उल्लेख केला आहे.

पन्नू याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘खुनी’ संबोधले आहे. ‘पंजाबमध्ये तुम्ही ज्या भाषेत बोलाल, त्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल. हे गुजरात नसून पंजाब आहे’, असेही त्याने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवायांमध्ये होत असलेली वाढच या धमकीतून दिसते. पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या एक दिवस आधीच शिवसेनेच्या हिंदु नेत्याची खलिस्तान्यांकडून हत्या केली जाते. हे पहाता आता केंद्र सरकारने खलिस्तानवाद्यांची कीड मुळासह नष्ट करण्यासाठी पावले उचलायला हवीत !