एलॉन मस्क यांची ५० टक्के कर्मचारी कपातीची चेतावणी

सॅन फ्रान्सिस्को – जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क हे टि्वटर आस्थापनाचे मालक झाल्यापासून आस्थापनातील घडामोडींना वेग आला आहे. मस्क यांनी आस्थापनातून ५० टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचे म्हटले आहे. मस्क यांनी या संदर्भातील घोषणा केल्यानंतर काही वेळातच जगभरातील अनेक भागांमध्ये टि्वटरची सेवा विस्कळीत झाल्याचे दिसून आले, टि्वटर भ्रमणभाषवर व्यवस्थित काम करत असले, तरी टि्वटर संगणकावर बर्‍याच तांत्रिक अडचणी येत असल्याचे वापरकर्त्यांच्या निदर्शनास आले. अनेकांना टि्वटरवर माहिती प्रसारित करण्यात अडचणी आल्या. अनेकांनी या तांत्रिक अडचणींचा संदर्भ कर्मचारी कपातीच्या चेतावणीशी जोडला आहे.

जगभरातील वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील तांत्रिक अडचणींवर लक्ष ठेऊन असलेल्या ‘डाऊन डिडेक्टर’वर अनेकांनी टि्वटर ‘रिफ्रेश’ होत नसल्याचे म्हटले आहे. अनेकांना टि्वटर संकेतस्थळावरून ‘लॉगइन’ करतांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे.