अमृतसरमध्ये खलिस्तान्यांकडून शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या

  • पोलीस संरक्षण आणि पोलिसांचा गराडा असतांना गोळीबार !

  • मंदिराबाहेरील कचराकुंडीत देवतांच्या मूर्ती सापडल्याच्या निषेधार्थ करत होते आंदोलन !

शिवसेनेचे नेते सुधीर सूरी

अमृतसर (पंजाब) – येथे पोलिसांचे संरक्षण असतांना शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. सूरी हे येथील गोपाल मंदिराबाहेर धरणे आंदोलनात करत होते. त्या वेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि शिपाई आंदोलनाला गराडा घालून त्यांच्याशी चर्चा करत होते. त्याच वेळी त्यांच्यावर समोरून गोळीबार करण्यात आला. या वेळी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी गोळीबार करणार्‍यावर गोळीबार केला; मात्र तो पळून गेला. नंतर त्याला नाकाबंदीमध्ये पकडण्यात आले. संदीप सिंह असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. तो ज्या गाडीतून आला होता, त्यावर ‘खलिस्तान’चे (खलिस्तान म्हणजे पंजाबला स्वतंत्र करून ‘खलिस्तान’ नावाचा देश बनवणे) स्टिकर लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. सूरी यांची हत्या करण्याचा कट विदेशातील खलिस्तान्यांकडून रचण्यात आला होता. या हत्येनंतर येथील हिंदूंच्या संघटनांनी ५ नोव्हेंबरला ‘पंजाब बंद’चे आवाहन केले आहे.

गोपाल मंदिराबाहेरील कचराकुंडीमध्ये देवतांच्या मूर्ती सापडल्यावरून सुधीर सूरी मंदिर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत होते. त्या वेळी त्यांचे समर्थक उपस्थित होते. आंदोलन चालू असतांनाच त्यांच्या छातीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर लगेचच त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दिवाळीपूर्वीच हत्येचा कट झाला होता उघड !

दिवाळीपूर्वी, म्हणजे २३ ऑक्टोबर या दिवशी पंजाब पोलिसांचे आतंकवादविरोधी पथक आणि अमृतसर पोलीस यांनी केलेल्या कारवाईत ४ गुंडांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत त्यांनी सुधीर सूरी यांची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती दिली होती. यासाठी त्यांनी सूरी यांच्या हालचालींची माहितीही गोळा केली होती. सूरी यांना ठार मारण्यापूर्वीच या गुंडांना अटक करण्यात आली होती. दिवाळीपूर्वीच त्यांना ठार मारण्यात येणार होते. त्यानंतर सूरी यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

  • सुधीर सूरी यांना पोलीस संरक्षण असतांना आणि मोठ्या संख्येने पोलीस तेथे उपस्थित असतांनाही त्यांची हत्या होत असेल, तर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हिंदूंसाठी चिंताजनक आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे !
  • पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवादी हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या नेत्यांना ठार मारत आहेत, हे यापूर्वीच उघड झाले असतांना तेथील हिंदूंच्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार काय करत आहे, हे सरकारने आता सांगितले पाहिजे ! पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार आल्यापासून खलिस्तानवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे हिंदूंच्या संघटनांनीही आता ‘आप’ सरकारवर दबाव आणला पाहिजे !