कणकवली येथे बालगोपाळ हनुमान मंदिरातील दानपेटी फोडणार्‍याला नागरिकांनी रंगेहात पकडले

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

कणकवली – शहरात २ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजता परमहंस भालचंद्र महाराज संस्थान नजीक असलेल्या बालगोपाळ हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरणार्‍याला येथील नागरिकांनी रंगेहात पकडले. या चोरासमवेत अन्य एक तरुण होता; मात्र तो साथीदाराला पकडल्याचे पाहून पसार झाला.

बालगोपाळ हनुमान मंदिरातील दानपेटी फोडत असतांना सकाळी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, अनिल अणावकर यांच्यासह तेथील अन्य काही जणांनी या चोराला पकडले. त्याच्या खिशात दानपेटीतील रक्कम आणि गुटखा, पानमसाला अशा वस्तूही आढळल्या. त्यामुळे या चोराने संस्थानच्या जवळ असलेल्या पानटपर्‍यांमध्येही चोरी केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी चौकशी केली असता शहरातील ‘नागवे रोड’वरील श्रीराम मंदिरातील दानपेटीही फोडल्याचे चोराने सांगितले. त्यानंतर नागरिकांनी चोराला पोलिसांच्या कह्यात दिले.