सिंधुदुर्ग – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित केला आहे. शासकीय काम करण्यासाठी लागणार्या शुल्काच्या व्यतिरिक्त कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी काम करण्यासाठी पैसे किंवा वस्तू यांची मागणी करत असेल, तर ती लाच आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लाच घेण्याचा प्रयत्न झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कुडाळ येथील जिल्हा कार्यालयात १०६४ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर, ०२३६२-२२२२८९ या दूरध्वनीवर, ९९३०९९७७०० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर, ९८९००७९२०८ या भ्रमणभाषवर किंवा www.acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर लेखी तक्रार द्यावी. ‘लाच घेणार्या लोकसेवकांची तक्रार करून भ्रष्टाचार संपवूया, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांनी केले आहे. (प्रतिवर्षी असे कार्यक्रम राबवून आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात शपथा घेऊनही भ्रष्टाचार थांबत नसेल, तर या मागचे मूळ कारण शोधणे अत्यंत महत्वाचे आहे. हे कारण म्हणजे समाजात पसरलेली स्वार्थी वृत्ती, अनैतिकता, कर्तव्याचा विसर आदी होय ! जोपर्यंत व्यक्तीची वृत्ती पालटत नाही, तोपर्यंत प्रतिवर्षी केवळ वरवरचे उपाय करून त्याचा लाभ होणार नाही. त्यासाठी नीतीमूल्यांचे शिक्षण देणे आणि साधना शिकवणे आवश्यक आहे. याची शासन आणि प्रशासन यांना जेव्हा जाणीव होऊन, त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न होईल, तेव्हाच खर्या अर्थाने देश भ्रष्टाचारमुक्त होईल ! – संपादक)