हिंदु युवतीला पळवून नेणार्‍या अल्ताफ काझीला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

कोल्हापूर येथील लव्ह जिहाचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – कोल्हापूर येथील २२ वर्षीय अल्ताफ काझी या मुसलमान युवकाने १४ वर्षीय हिंदु युवतीचे अपहरण करून तिला पळवून नेले होते. अल्ताफ याला २ नोव्हेंबरला रात्री संकेश्‍वर (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कह्यात दिले. यानंतर ३ नोव्हेंबर या दिवशी राजवाडा पोलिसांनी अल्ताफ याला कोल्हापूर येथील न्यायालयात उपस्थित केले असता त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गेल्या मासात अल्ताफ याच्यावर गुन्हा नोंद होऊनही १८ दिवस हिंदु युवती सापडत नसल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २ नोव्हेंबर या दिवशी राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर जनआंदोलन करण्यात आले होते. २ दिवसांत युवती न सापडल्यास ‘तांडव’ करण्याची चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या प्रसंगी दिली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हालवत अल्ताफ याच्या नातेवाइकांकडे कसून चौकशी केली.

आम्ही आंदोलन केल्यावर काही घंट्यांत तरुणी घरी कशी येते ? – नितेश राणे, आमदार, भाजप

कोल्हापूर येथील तरुणी गेल्या १८ दिवसांपासून गायब होती. आम्ही जनआंदोलन केल्यानंतर काही घंट्यांत ती कशी काय परत येते ? राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार असून यापुढील काळात कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने लक्ष्य केल्यास आम्ही सोडणार नाही. येणार्‍या अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचा अभ्यास चालू असून लवकरच कायदा येईल आणि अशा घटना थांबतील.