शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात भारत जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानी !

आफ्रिकी देशांना करत आहे अधिकाधिक निर्यात !

नवी देहली – शस्त्रास्त्रांच्या निर्यातीचा अहवाल मांडणार्‍या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’नुसार वर्ष २०१७ ते २०२१ या कालावधीत भारत हा जगातील २३ वा सर्वांत मोठा शस्त्रास्त्रांचा निर्यातदार देश बनला. आफ्रिकी देशांसाठी समुद्री आणि हवाई सुरक्षा, तसेच संरक्षणाची इतर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारत एक महत्त्वपूर्ण देश बनला आहे. वर्ष २०१७ ते २०२१ या ५ वर्षांमध्ये मॉरिशस, मोजाम्बिक आणि सेशल्स या देशांनी भारताकडून सर्वाधिक शस्त्रास्त्रे विकत घेतली. ही माहिती ‘इंडियन एक्जिम बँके’ने त्याच्या एका अहवालात प्रकाशित दिली आहे. भारत आणि आफ्रिकी देशांमधील वाढत्या सहकार्यावर ‘सीआईआई’ आणि ‘एक्जिम बँक’ यांच्याकडून आयोजित प्रांतीय परिषदेत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.

१. हिंद महासागर क्षेत्रातील ९ तटीय अफ्रिकी देशांसह अन्य अनेक देशांसाठी सुरक्षित समुद्री वातावरण निर्माणण्याचा भारताचा प्रयत्न आहे. केनिया, कोमोरोस, मॅडागास्कर, मॉरिशस, मोजाम्बिक, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि सोमालिया या ९ तटीय आफ्रिकी देशांचा यात समावेश आहे.

२. या अहवालानुसार भारत आफ्रिकी देशांच्या आवश्यकतांनुसार त्यांना संरक्षण साहाय्य करत आहे. यामध्ये त्यांची सैन्यक्षमता वाढवणे, त्यांना प्रशिक्षित करणे आणि मानवीय साहाय्य उपलब्ध करून देणे, यांचाही समावेश आहे.

३. टाटा मोटर्स आणि अशोक लेलँड यांनी बनवलेली सैन्यासाठीची वाहने आफ्रिकी देशांना निर्यात केली जात आहेत.

४. वर्ष २०२५ पर्यंत भारताने संरक्षण क्षेत्रातील निर्यात ५०० कोटी डॉलर्सपर्यंत (४० सहस्र कोटी रुपयांपर्यंत) नेण्याचे उदिष्ट ठेवले आहे.