दाबोळी विमानतळ बंद करणार नाही ! – व्ही.के. सिंह, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री

दाबोळी विमानतळ

पणजी, २ नोव्हेंबर (वार्ता.) – मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचीही उपस्थिती होती. आशियाई पॅसिफिक परिषदेचे गोव्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्घाटन झाले. केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह या परिषदेच्या उद्घाटनासाठी गोव्यात आले आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘‘दाबोळी विमानतळ नौदलाच्या कह्यात असल्याने त्या ठिकाणी वेळेचे निर्बंध आहेत. त्या ठिकाणी निर्धारित वेळेत येऊ न शकणारी विमाने किंवा अतिरिक्त विमाने मोपा विमानतळावर वळवली जाणार आहेत. दोन्ही विमानतळे चालू ठेवण्याविषयी केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका आहे आणि वर्ष २०१० मध्ये मंत्रीमंडळाने तसा स्पष्ट निर्णय घेतलेला आहे. लोकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये.’’ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मोपा विमानतळाच्या उद्घाटनाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले, ‘‘गोवा सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चालू मासात मोपा विमानतळाच्या उद्घाटनासाठी त्यांच्या येण्याचा दिवस (दिनांक) मागितला आहे. दिनांक निश्चित झाल्यानंतर मोपा विमानतळाच्या राष्ट्रार्पणाचा कार्यक्रम होईल.’’