गेल्या वर्षी पुण्यात ऐतिहासिक अतीवृष्टी झाली. अचानक महापूर आला. २३ माणसे मृत पावली. वाताहात झाली. मोटारी खेळण्यांप्रमाणे फेकल्या गेल्या. तशीच अतीवृष्टी यंदा १८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी झाली. असा पाऊस झाला की, नेहमी प्लास्टिकवर मुद्दा येऊन थांबतो. प्लास्टिक तर उपद्रवी आहेच; पण आता त्या पलीकडे काही आहे, हे जनतेला कळावे, यासाठी लेखप्रपंच…
१. सिमेंटमुळे एका वर्षात कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन अनुमाने ४०० कोटी टन होणे आणि परिणामी ढगफुटीच्या रूपात पाऊस पडणे
सिमेंट काँक्रिटच्या विनाशकारी स्वरूपाविषयी जनतेला माहिती होणे आवश्यक आहे. वर्ष १९७० पासून जेवढे कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन प्लास्टिक निर्माण करतांना झाले तेवढे, म्हणजे ८०० कोटी टन उत्सर्जन फक्त गेल्या २ वर्षांत सिमेंट निर्मितीत झाले. शेती, जंगलाचे सृजन, पूर नियंत्रण, प्राणवायू निर्माण, पाण्याचे शुद्धीकरण यांसह डोंगर, नद्या, झरे, भूजल, तलाव, पाणथळ भूमी आणि सागरकिनारे यांची कधीही न भरून येणारी अपरिमित हानी सिमेंटने केली.
सिमेंट बनवतांना त्याच्या अर्ध्या वजनाचा कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात जातो. गतवर्षीच्या कार्बन डायऑक्साईडच्या एकूण ३ सहस्र ८०० कोटी टन उत्सर्जनात अनुमाने ४०० कोटी टनाचा वाटा सिमेंटचा आहे. हा कार्बन सूर्याची उष्णता शोषतो. त्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ध्रुवीय प्रदेश, पर्वतांवरील बर्फ आणि महासागराच्या पाण्याची वाढती वाफ ढगफुटीच्या रूपाने कोसळत आहे. पुण्यात २ घंट्यांत ६ इंच पावसाने घडवलेला कहर सर्वांनीच पाहिला आहे.
२. शहरांचे प्रचंड सिमेंटीकरण, म्हणजेच देश आणि पृथ्वी यांचे वाळवंटीकरण !
अमेरिकेने पूर्ण २० व्या शतकात पृथ्वीवर ओतलेल्या सिमेंट एवढे सिमेंट चीनने वर्ष २००३ नंतर प्रति ३ वर्षांच्या काळात बांधकामांचे उधाण आणून ओतले. आता भारतात ‘India is under construction (भारताचे पुनर्निर्माण चालू आहे)’, अशी बतावणी करून तोच अनर्थ केला जात आहे. नदी, सागर, तलाव, विहिरी यांमध्ये सिमेंट शिरले. भूमीत मिसळले. या स्रोतांचा जीव गुदमरला. केरळची दुर्घटना पहा. पाण्याचे प्रवाह कुंठित झाले. निचरा बंद झाला. सिमेंटचे आच्छादन घालणे म्हणजे ‘विकास’ अशी कल्पना रूढ झाली आहे. मुंबई, न्यूयॉर्क, टोकियो, शांघायसारख्या शहरांचे प्रचंड सिमेंटीकरण, म्हणजेच देश आणि पृथ्वी यांचे वाळवंटीकरण आहे. ‘एम्.एम्.आर्.डी.ए.’च्या (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या) क्षेत्राचा अलिबाग, डहाणूपर्यंत विस्तार हा वाळवंटीकरणाचा विस्तार आहे. हा नापिकी आणि पाणी समस्या यांचा विस्तार आहे. तो एका बाजूला वेगाने होत असून पुन्हा नापिकी, पाणी आणि वाळवंटीकरण या समस्या रोखण्यासाठी जगभरात संयुक्त राष्ट्रांच्या निष्फळ परिषदा होत आहेत.
३. सिमेंटच्या वाढत्या वापरामुळे अन्नोत्पादनात झपाट्याने घट होत असणे
सिमेंटीकरणाने डोंगर तर तोडलेच; परंतु सिमेंट आवरणाच्या, जनतेच्या हव्यासाने जीवसृष्टीची अक्षम्य हिंसा चालवली आहे. वर्ष १८२४ मध्ये फ्रान्समध्ये प्रथम सिमेंटचा शोध लागला. आता जगात प्रतिवर्षी कोट्यवधी टन सिमेंट साध्या रासायनिक प्रक्रियेने सहज बनते; पण जी माती त्याने आच्छादली जाते, तिची भरपाई होऊ शकत नाही. जंगलातील ओंजळभर मातीत अनुमाने १ सहस्र कोटी जिवाणू असतात. जगातील सर्व वैज्ञानिक प्रयोगशाळांनी सर्व पैसा वापरला, तरीही ओंजळभर माती बनवता येणार नाही. मातीतून अन्न पिकते. आता सिमेंटच्या वाढत्या वापराबरोबर एकरी अन्नोत्पादन झपाट्याने घटत आहे.
४. जीवसृष्टी क्षणात सिमेंटखाली गाडली जाणे
बेडूक आणि इतर अनेक जीव सुप्तावस्थेत स्वतःच्या ऊर्जेचा व्यय किमान करून आणि स्वतःला निष्क्रीय बनवून पावसाळ्याची अनुकूल स्थिती येईपर्यंत किंवा हिवाळा टाळण्यासाठी भूमीत गाडून घेतात. ही जीवसृष्टीने कोट्यवधी वर्षांत मिळवलेली अद्भुत क्षमता चकित करते. या जीवसृष्टीला क्षणात सिमेंटखाली गाडतांना वा तिची जिवंतपणी कबर बांधताना माणसाला लाज वाटली पाहिजे. पुरात मोडलेल्या मोटारी आणि फुटलेल्या रस्त्याविषयी हळहळ वाटण्याची आवश्यकता नाही. खरेतर त्यांच्या निर्मितीत उद्ध्वस्त झालेल्या पृथ्वीविषयी ती वाटली पाहिजे.
५. बिल गेट्स यांनी जीवसृष्टी वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी काढून त्याद्वारे प्रयत्न करणे; पण त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यून न करणे
आता पॅरिस करारातील मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक असलेली सरासरी तापमानातील २ सेल्सियस वाढीची मर्यादा पुढील २ वर्षांत ओलांडली जात आहे; म्हणून बिल गेट्स यांच्यासारखा आतापर्यंत तंत्रज्ञानाला वेग देऊन अमर्याद विध्वंस घडवणारा धनाढ्य माणूस हवालदिल झाला आहे. त्यांनी २०० कोटी डॉलर्सची (१४ कोटी ८५ लाख कोटी रुपये) रक्कम तापमानवाढीपासून जीवसृष्टी वाचवण्यासाठी बाजूला काढली आहे. ही मोठी वाटणारी रक्कम त्यांच्या अफाट उत्पन्नाचा विचार करता फार नाही. जीवसृष्टी वाचवण्याचा मुद्दा पैसा आणि तंत्रज्ञान यांनी हा प्रश्न सुटेल, असे त्यांना वाटते.
गंमत अशी आहे की, या बिल गेट्स यांचे सर्वांत आवडते घर कॅलिफोर्नियातील डोंगरावरील जंगलात बांधलेले असून ते मातीचे आहे. मातीच्या घरांनी पृथ्वीला इजा केली नव्हती आणि हाच मानवजात वाचण्याचा उपाय आहे, हे गेट्स यांच्या लक्षात येत नाही. त्यांनी ते घरही आधुनिक सुखसोयींनी म्हणजे तंत्रज्ञानाच्या करामतीने सुसज्ज केले आहे. हेच तंत्रज्ञान आणि वस्तूनिर्मिती ही माती अन् पृथ्वी यांच्या विरोधात जाते, याचे त्यांना भान नाही. ‘तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’, अशी स्थिती आहे. बिल गेट्स जर त्यांच्या मोटारी, कंपन्या सोडतील, त्यांचे मायक्रोसॉफ्टचे संगणकाचे कृत्रिम जग सोडतील, ते चालवायला लागणारी वीज सोडतील, तर वाचेल आणि त्यांना मानणारे जगही वाचेल; पण आपण (मानव) चुकलो, हे स्वीकारण्याची त्यांची सिद्धता नाही.
६. हिंदु धर्मग्रंथांमध्ये संपत्तीच्या संचयाला वर्ज्य मानले जाणे
भारतियांनी संपत्तीच्या संचयाला वर्ज्य मानले. ‘ईशोपनिषद’ या मुख्य आणि प्रथम उपनिषदाचा पहिला मंत्र म्हणतो, ‘‘ईश्वर विश्वातील प्रत्येक अणूरेणूत आहे. त्याच्यासाठी त्यागून किंवा त्याने जे आपणासाठी त्यागले, त्याचाच फक्त उपभोग घ्यावा. इतर कुणाच्या आणि कशाची वा धनाचीही इच्छा धरू नये.’’ यात निष्क्रीयता नाही; कारण दुसरा मंत्र म्हणतो, ‘‘या पृथ्वीवर कर्म करत तू १०० वर्षे जगण्याची इच्छा कर. मनुष्यत्वाची जाणीव असलेल्या तुला, याखेरीज अन्य मार्ग नाही. ज्या कर्माने तू लिप्त होणार नाहीस, बांधला जाणार नाही.
७. भारतीय भौतिक सुखांच्या मागे धावत असल्यामुळे जीवन पूर्ण नष्ट होण्याकडे त्यांची वाटचाल चालू असणे
या शाश्वत अस्तित्व देणार्या सत्प्रवृत्त अनासक्तीच्या विरुद्ध प्रचलित अर्थव्यवस्था आहे. आपल्या पूर्वजांनी भौतिक सुख सोडले. भारताचा स्वातंत्र्यलढा याच तत्त्वावर झाला. म. गांधी आणि स्वामी विवेकानंद यांनी हेच सांगितले. आज भारतीय भौतिक सुखांच्या मागे धावून जीवन आणि स्वातंत्र्यही सोडत आहेत. असाही विचार करणारे शिक्षित सज्ज झाले आहेत की, माणसांना लागेल तेवढा प्राणवायू देणारी झाडे, पाणी आणि अन्न ठेवले की, बाकी झाडे, जैविक विविधता अन् पृथ्वीवरील डोंगर यांच्यासारख्या आविष्कारांची आवश्यकता काय ? उद्योग, वीजनिर्मिती, वाहतूक, बांधकामे, रासायनिक-यांत्रिक शेती, अगणित वस्तूनिर्माण करावे, मोटारी, टिव्ही इत्यादी भौतिक सुखे बनवत रहावे, असे त्याला वाटते. याला ते जीवनाचा दर्जा राखणे मानतात. यात कार्बन उत्सर्जन वाढेल, हरितद्रव्य नष्ट होईल, धातू सिमेंटसाठी डोंगर नष्ट होतील, तापमान वाढून हवामानातील पालट विक्राळ स्वरूपाच्या दुर्घटना घडवतील, प्राणवायू संपुष्टात येईल. थोडक्यात जीवन पूर्ण नष्ट होईल, याकडे त्यांचे लक्ष नाही.
८. मानवाला तंत्रज्ञान, व्यापार आणि यश यांच्या कल्पनांनी पछाडल्याने तो अवास्तव मनोविश्वात रमणे
‘ऑनलाईन’ खरेदी-विक्रीमुळे जगातील सर्वांत धनाढ्यांच्या पंक्तीत गेलेले जेफ बेझोस काही दिवसांपूर्वी म्हणाले, ‘‘पृथ्वीवरील संसाधने संपुष्टात येत आहेत. आपल्याला ‘बॅकअप’ ग्रहाची आवश्यकता आहे. मंगळ तसा ग्रह आहे. मी माझे पैसे या अंतरिक्षातील उद्योग व्यापारासाठी गुंतवत आहे. चंद्राचा यात तळ म्हणून वापर केला जाईल.’’ हे बोलणे एखाद्या विज्ञानरंजन, कथा, कादंबरी, सिनेमातील वाटते; पण तसे नाही. तंत्रज्ञान, व्यापार आणि यश यांच्या कल्पनांनी पछाडल्याने अवास्तव मनोविश्वात ही माणसे गेली आहेत. दुर्दैवाने आज भारतियांना गीता – उपनिषदे मार्गदर्शन करत नसून जेफ बेझोससारखे बौद्धिक भणंग (भिकारी) त्यांचे आदर्श (रोल मॉडेल) आहेत.
९. मानवाने अस्तित्व राखण्यासाठी स्वयंचलित वाहने तात्काळ थांबवण्याची आवश्यकता असणे
आजची जनता आयुष्य निष्क्रीयतेने काढलेल्या संपादकांकडूनही बोधामृत घेत असते. मुळातच चुकीच्या चांद्रयान प्रकल्पाला अपयश आल्यानंतरही त्यात प्रगतीच्या पाऊलखुणा पहाणार्या एका विकासखोर संपादकांनी याच बेझोसची रि ओढून म्हटले, ‘आता अंतरिक्षाची नवी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यात भारताने आघाडी घ्यावी.’ या महाशयांच्या मते रामायण आणि महाभारत काळातही तापमान वाढले होते. तापमानवाढीत विशेष काही नाही. त्यांना आणि तंत्रज्ञानाने भारावलेल्यांना हे ठाऊक नाही की, अस्तित्वात रहायचे, तर चांद्रभूमीवर विहार करण्यासाठी पाठवलेले ‘विक्रम’ वाहन तर सोडाच; पण पृथ्वीवर आता धावणारी सर्व स्वयंचलित वाहने तात्काळ थांबवण्याची आणि सोडण्याची ही वेळ आहे. असे झाले, तरच फक्त ३-४ दशकांत नष्ट होणारी मानवजात अन् जीवसृष्टी वाचू शकते.
– अधिवक्ता गिरीश राऊत, निमंत्रक, भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळ (२२.१०.२०२२)
(साभार : सामाजिक माध्यम)
संपादकीय भूमिकाविकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होत असलेला र्हास आणि हानी रोखण्यासाठी धर्माधारित शाश्वत विकास हवा ! |