महाराष्ट्रातून गेलेल्या सर्व प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई – मागील १५ दिवसांपासून राज्यातील उद्योगक्षेत्राविषयी नकारात्मक वातावरण निर्माण केले जात आहे. सॅफ्रोन आस्थापन भाग्यनगर येथे गेल्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, सॅफ्रन यांसह, तसेच अन्य सर्व प्रकल्प अशा महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांशी एका मासाभरात श्वेतपत्रिका काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी उदय सामंत म्हणाले, ‘‘सॅफ्रन आस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ५ जुलै २०२२ या दिवशी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सॅफ्रन प्रकल्प भाग्यनगर येथे स्थापन करण्याचे घोषित केले. या प्रकल्पासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारे भूमीसाठी पाठपुरावा करण्यात आलेला नाही. शासनाकडून काढण्यात येणार्‍या श्वेतपत्रिकेमध्ये महाराष्ट्र शासनाने या आस्थापनांसमवेत केलेले पत्रव्यवहार, तसेच औद्योगिक विकास महामंडळासमवेत झालेल्या बैठका यांची माहिती देण्यात येईल.’’