शिवनेरी (पुणे) गडाच्या पायथ्याशी वाहनतळासाठी जागा द्यावी ! – श्री शिवाई मंदिर देवस्थान ट्रस्ट

पुणे – शिवनेरी गडावर पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहनतळाची समस्या गंभीर होत आहे. गडाच्या पायथ्याशी असणार्‍या दत्तनगर येथील पुनर्वसित गावठाणाची जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ‘श्री शिवाई मंदिर देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ‘सकारात्मक कार्यवाही करत शिवभक्त आणि पर्यटक यांची समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू’ असे आश्वासन प्रांताधिकारी कोडोलकर यांनी दिले.

निवेदनात म्हणले आहे की, शिवनेरी गड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होण्याकरता अनेक शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. ते बस, चारचाकी आणि दुचाकी वाहनांनी येत असल्यामुळे या सर्व गाड्या उभ्या करण्यासाठी वाहनतळाची जागा नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जातात. त्यातून वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी दत्तनगर येथील जागा वाहनतळाकरता उपलब्ध करून द्यावी.