इतर राज्यांत स्थलांतरित होणार्‍या उद्योगांविषयी श्वेतपत्रिका काढली पाहिजे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

नागपूर – वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रनसह अन्य प्रकल्पांविषयी नेमके काय झाले, ही वस्तूस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३१ ऑक्टोबर येथे पत्रकारांशी बोलतांना केली. ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनसेवेत व्यस्त असल्यामुळे आरोप करणार्‍यांचे चांगले फावले असून त्याचाच लाभ घेत ते खोटी माहिती पसरवत आहेत’, असा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला.

ते म्हणाले की,

१. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात येथे गेल्याचा आरोप करणारे एकही कागद दाखवत नाहीत. त्यांनी कागद कपाटात बंद करून ठेवले आहेत का ? या संदर्भात छोट्या नेत्यांकडून फार अपेक्षा नाहीत; कारण त्यांना कागद उपलब्ध होणार नाहीत; पण अनेक वर्षर्े मोठ्या पदांवर काम करणारे नेते आणि कुटुंब यांनी निदान कागदपत्रे द्यावीत.

२. महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यांत गेल्याच्या संदर्भात मी स्वतः उद्योग सचिवांशी चर्चा केली आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे काही नेते पत्रकार परिषद घेत आहेत; पण कोणताही कागद दाखवत नाही. टाटाच्या संदर्भात अधिकार्‍यांसमवेत तत्कालीन उद्योगमंत्र्यांच्या बैठका झालेल्या नाहीत.

३. त्यांच्या सरकारने कुठलेही पत्र दिले नाही. एखाद्या औद्योगिक वसाहतीसाठी अर्ज केला नाही. असे असतांना अशा पद्धतीने त्यांनी हवा करणे चालू केल्याविषयी मला आश्चर्य वाटते.

४. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या १२ सहस्र कोटी रुपयांच्या कामाची ‘कॅग’ चौकशी करणार आहे. ‘कॅग’चे लेखापरीक्षण होत असते आणि मागणी केल्यावर ते आता अधिक वेगाने होईल. त्या कामांत अनियमितता, अपप्रकार आणि भ्रष्टाचार झाला असेल, तर तो उघडकीस येईल.