अमरावती येथील धोकादायक इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू !

अमरावती येथील धोकादायक इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू

अमरावती – शहरातील प्रभात चौक येथील धोकादायक स्थितीतील इमारत ३० ऑक्टोबर या दिवशी दुपारी १.३० वाजता कोसळल्याने इमारतीच्या तळमजल्यावरील ‘राजदीप एम्पोरियम’ येथे गवंडीकाम करणारे ४ कामगार आणि व्यवस्थापक अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारत दुरुस्तीचे काम चालू असतांना ही घटना घडली. त्या वेळी आत ७ जण होते.

इमारत धोकादायक असल्याने महानगरपालिकेद्वारे या इमारतीच्या मालकांना ३ नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तिसर्‍या नोटिशीमध्ये इमारत पाडण्याची चेतावणी महापालिकेने दिली होती; परंतु त्याकडे तळमजल्यावरील पाचही दुकानदारांनी लक्षच दिले नाही, तसेच या इमारतीविषयी मालक जैन आणि पाचही दुकानदार यांच्यात न्यायालयात वाद चालू आहे.

मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ५ लाख रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.