आज ३१ ऑक्टोबर २०२२ या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
१. जन्म आणि शिक्षण
‘सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१.१०.१८७५ या दिवशी गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील करमसद गावी झाला. त्यांचे वडील झवेरभाई पटेल हे सर्वसामान्य शेतकरी होते आणि त्यांची आई लाडबाई या धर्मनिष्ठ होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी आणि उच्चशिक्षण नडियाद अन् बडोदा येथे झाले. त्यानंतर ते सल्लागार (मुख्त्यार) पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
२. सत्यनिष्ठ, निर्भीड आणि कर्तव्यनिष्ठ
अ. सरदार पटेल हे विद्यार्थी जीवनापासूनच सत्यनिष्ठ, निर्भीड आणि कर्तव्यनिष्ठ होते. नडियाद पाठशाळेतील एक शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याच दुकानातून पुस्तके विकत घेण्याची सक्ती करत होते. तेव्हा वल्लभभाईंनी त्याला विरोध केला आणि विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाच्या जाचातून सोडवले.
आ. ते गोध्राचे मुख्य सल्लागार असतांना त्यांना त्यांच्या पत्नीच्या निधनाचे वृत्त मिळाले. त्या वेळी ते एका महत्त्वाच्या कामात व्यस्त होते. त्यांनी तार वाचली आणि पटलावर ठेवून दिली. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी निधनाविषयी इतरांना सांगितले.
३. वकिली सोडून देशसेवेसाठी समर्पित केलेले जीवन
सरदार पटेल लंडनहून वकिलीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये वकिलीचा व्यवसाय चालू केला. वर्ष १९१६ मध्ये गोध्रामध्ये झालेले आंदोलन आणि वर्ष १९१८ चा ‘खेडा सत्याग्रह’ यांत त्यांनी सक्रीय भाग घेतला. त्यांनी वर्ष १९२१ मध्ये असहकार आंदोलनात भाग घेण्यासाठी त्यांचा वकिली व्यवसाय सोडून दिला. देशसेवेसाठी कित्येक वेळा ते कारागृहातही गेले. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन बारडोलीच्या महिलांनी त्यांना ‘सरदार’ ही पदवी दिली. वर्ष १९३१ मध्ये कराची अधिवेशनात त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले.
४. हिंदुस्थानातील अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात करून घेतलेले विलीनीकरण
वर्ष १९४६ मध्ये स्थापन झालेल्या तत्कालीन ब्रिटीश शासनामध्ये सरदार पटेल भारताचे गृहमंत्री होते. देशाला स्वातंत्र्य देण्याच्या वेळी इंग्रजांनी अर्धस्वायत्त असलेल्या संस्थानिकांना भारत किंवा पाकिस्तान यांमध्ये विलीन होण्याचा किंवा स्वतंत्र रहाण्याचा अधिकार दिला होता. त्यामुळे देशाची अखंडता संकटात आली होती. अशा स्थितीत सरदार पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीने संस्थानिकांना भारतामध्ये विलीन करून घेतले. नंतर हैद्राबाद आणि जुनागढ येथील संस्थानिकांनी पाकिस्तानात विलीन होण्याचा आग्रह धरला होता, तेव्हा सरदार पटेल यांनी त्यांच्यावर सैनिकी कार्यवाही करून त्यांना भारतात विलीन करून घेतले. भारताची एकता आणि अखंडता यांसाठी योगदान देणार्या सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘लोहपुरुष’ असे संबोधले जाते. काश्मीरचा विषय पं. नेहरूंनी स्वतःच्या हातात राखून ठेवला. त्यामुळे तो भारतासाठी आजपर्यंत डोकेदुखीचा विषय ठरला आहे. ५.८.२०१६ या दिवशी आताच्या केंद्र सरकारने कलम ३७० (जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम) रहित करून वैध मार्गाने काश्मीरला भारतीय गणराज्यात विलीन केले.
५. सोमनाथ मंदिराचा जीर्णाेद्धार
सरदार पटेल यांनी राष्ट्रगौरवाचे प्रतीक असलेल्या प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णाेद्धार करण्याचा निश्चय करून मंदिराच्या पुनर्बांधणीला आरंभ केला. त्यांच्या मृत्यूनंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. ११.५.१९५१ या दिवशी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने त्याची पायाभरणी करण्यात आली.
६. निधन आणि मृत्यूत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार
१५.१२.१९५० या दिवशी अखंड भारताचे शिल्पकार सरदार पटेल यांचे निधन झाले. संपूर्ण भारत दुःखाच्या सागरात लोटला गेला. भारत सरकारने वर्ष १९९१ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ या सर्वाेच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित केले.’
– विजयसिंह माली, प्रधानाचार्य सहसंपादक
(साभार : ‘गीता स्वाध्याय’, वर्ष १०, अंक ७, ऑक्टोबर २०१९)