कोईम्बतूर स्फोट प्रकरणी ‘एन्.आय.ए.’कडून गुन्हा नोंद : बाँब बनवण्याची स्फोटके हस्तगत

कोईम्बतूर (तमिळनाडू) – येथे २३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी झालेल्या स्फोट प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) नुकताच गुन्हा नोंद केला. ज्या चारचाकीमध्ये हा स्फोट झाला होता, ती चारचाकी या स्फोटामध्ये मृत्यूमुखी पडलेला आतंकवादी जमीशा मुबीन याच्या मालकीच्या असल्याचे ‘एन्.आय.ए.’कडून गुन्ह्यामध्ये नोंद करण्यात आले आहे. ‘एन्.आय.ए.’ने मुबीन याच्या घरातून बाँब बनवण्याची सामुग्री हस्तगत केली आहे.

‘एन्.आय.ए.’च्या पथकाने मुबीनच्या घराची झडती घेतली होती. या वेळी तेथून पोटॅशियम नायट्रेट, ब्लॅक पावडर, नायट्रो ग्लिसरीन, लाल फॉस्फरस इत्यादी स्फोटके जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.