‘अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.’ची स्थापना !

  • कोकणातील शेतकरी बांधवांसाठी आनंदवार्ता !

  • पिकांसाठीचे साहाय्य मिळणार

आस्थापनेच्या स्थापनेप्रसंगी उपस्थित श्री. रविंद्र प्रभुदेसाई (मध्यभागी)

रत्नागिरी – भारत हा कृषीप्रधान देश आहे; परंतु बियाणांच्या उपलब्धतेपासून सिद्ध झालेल्या मालाला मिळणार्‍या भावापर्यंत शेतकरी बांधवांच्या अनेक समस्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याने शेतकर्‍यांची उन्नती होण्याच्या दिशेने प्रत्यक्षात काहीच होतांना दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे. यावर उपाय म्हणजे शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. याच उद्देशाने कोकणातील राजापूर तालुक्यातील तळवडे येथे ‘अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.’ची स्थापना करण्यात आली आहे. तळवडे येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तळवडे येथील भूमीपुत्र आणि ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र प्रभुदेसाई हे या आस्थापनाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर तळवडे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. प्रदीप प्रभुदेसाई हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि श्री. प्रणव मुळे हे समन्वयकपदाचे दायित्व सांभाळतील.

प्रारंभी रत्नागिरी जिल्ह्यातील ऊस, तांदूळ, नेंद्रान केळी, शेंगदाणा आणि बांबू यांची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना याचे सदस्यत्व घेता येणार आहे. वरील पिकांसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहाय्य आस्थापनाकडून करण्यात येणार असून सिद्ध मालाची रास्त दरात खरेदी आणि विक्री आस्थापनाकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

पितांबरी आस्थापन गेल्या ३० वर्षांपासून अभिनव उत्पादनांची विक्री आणि वितरण करत असल्याने संपूर्ण देशभर आस्थापनाची सक्षम वितरण व्यवस्था आहे. तसेच आस्थापनाच्या ‘ॲग्रिकेअर डिव्हिजन’चे महाराष्ट्र्रातील सर्व कृषी विद्यापीठांसमवेत दृढ संबंध असल्याने पितांबरी सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी समर्थपणे उभी असेल’, असे आश्वासन देत रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना यात सहभागी होण्याचे आवाहन ‘अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.’चे अध्यक्ष श्री. रविंद्र प्रभुदेसाई यांनी या वेळी केले. या संदर्भात अधिक माहिती किंवा चौकशीसाठी श्री. प्रणव मुळे यांच्याशी ९४०५५५८८६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.